सातारा : वारसनाेंद करून सातबारा उतारा देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना माण तालुक्यातील वरकुटे-म्हसवड येथील तलाठ्याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.
दादासो अनिल नरळे (वय ३७, रा. पाणवण, ता. माण, जि. सातारा) असे लाच घेताना रंगेहात सापडलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित तक्रारदार २१ वर्षीय असून, त्यांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. तक्रारदार आणि त्यांच्या बहिणीची वारसदार म्हणून सातबारा उताऱ्यावर नोंद करायची होती. यासाठी तक्रारदार वरकुटे-म्हसवड येथील तलाठी कार्यालयात गेले. त्यावेळी तलाठी दादासो नरळे याने तक्रारदाराकडे तीन हजारांची मागणी केली. यामुळे तक्रारदाराने तत्काळ सातारा येथे येऊन लाचलुचपत विभागामध्ये रितसर लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपतच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ सप्टेंबर रोजी दुपारी वरकुटे-म्हसवड तलाठी कार्यालयात सापळा लावला. या सापळ्यामध्ये तलाठी दादासो नरळे हा दोन हजारांची लाच घेताना रंगेहात सापडला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विनोद राजे, संभाजी काटकर, तुषार भोसले, नीलेश येवले यांनी केली.