सातारा : सातारा पालिकेची मालमत्ता व भूखंड हडप करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी शहर सुधार समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा पालिकेची अंदाजपत्रकीय सभा यंदा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. त्याचे निरीक्षण केल्यानंतर सार्वजनिक आरोग्य, शासकीय मालमत्ता, नगरपालिका मालमत्ता, खुल्या जागा, सेवा उद्योग क्षेत्र आदींचे विवरण अंदाजपत्रकात नसल्याचे स्पष्ट होते. उलट हुतात्मा स्मारक, आरटीओ परिसर तसेच मध्यवर्ती वस्तीत नगरपरिषद शाळा क्रमांक ११, १३ व १४ या इमारतीसमोरील भारतरत्न मौलाना आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात टपरीकरण झाले आहे.
ही बाब गंभीर असून, पालिकेने याबाबत योग्य ती कारवाई करावी, जागा संरक्षित करून मौलाना आझाद मैदान विकसित करावे, अशी मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, या मागण्यांबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने शहर सुधार समितीला आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला. आंदोलनात शहर सुधार समितीचे सचिव अस्लम तडसरकर, कौन्सिल सदस्य विक्रांत पवार यांच्यासह समितीच्या सदस्यांनी सहभाग घेतला.
फोटो : ०८ जावेद खान ०१
शहर सुधार समितीच्या वतीने सोमवारी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. (छाया : जावेद खान)