वडगाव हवेली : तालुक्यात गत काही दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. वारंवार होणाऱ्या पावसामुळे ऊसतोडीचा खोळंबा होत असून, परिणामी यावर्षीचा गळित हंगाम लांबण्याची शक्यता आहे.तालुक्यातील साखर कारखान्यांपुढे गळित हंगाम पूर्ण करण्याचे आव्हान असताना अवकाळी पावसाने गळित हंगामामध्ये अडथळा आणला आहे. शेतकऱ्यांना वेळेत ऊसतोड करून मशागत करायची गडबड असताना अवकाळीने शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. कारखान्यांच्या सुरू हंगामातील गळित पूर्ण करण्यासाठी ऊस फड पेटवून शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. परंतु, आपला ऊस तोडून जाणे महत्त्वाचे असल्यामुळे शेतकरी जाईल त्या परिस्थितीत ऊसतोड करून घेण्याच्या मन:स्थितीत आहेत.ऊसतोडणी कामगारांना कडक उन्हामध्ये ऊसतोड करावी लागत आहे. हंगाम संपेपर्यंत फड पेटवून ऊसतोडणी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. ऊस न पेटवता हंगाम पूर्ण करणे कारखान्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे पेटवून ऊस तोडणी सुरू केल्याचे पाहावयाय मिळत आहे. हंगाम कधी संपतो, असे या तोडणी कामगारांना झाले आहे. त्यांना त्यांच्या गावाकडे जाण्याची ओढ लागली आहे. परंतु अवकाळी पावसामुळे कामगारांचे गावाकडे जाण्याचे दिवस लांबणीवर जात आहेत. ऊसतोडणी हंगामाचे अखेरचे दिवस शेतकऱ्यांसाठी त्रासाचे असतात. शेतकऱ्यांना आपला ऊस तोडणीचे संकट समोर असते तर ऊस तोडणी कामगारांना कारखान्याचा गळित हंगाम आटोपण्याचे संकट समोर असते, अशा वेळी ऊस पेटवून ऊसतोड करण्याच्या सूचना कारखान्यांकडून मिळाल्याने ऊस तोडणी कामगारांना ऊसतोडणी सुलभ झाली आहे. पेटवून नेलेल्या उसाला कपात न करता बिल मिळणार असल्याने जाईल त्या परिस्थितीत ऊसतोड करून घेणे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पसंत केले आहे. (प्रतिनिधी) उसाचा घात होतोच कसा?जिल्ह्याच्या सर्वच भागातील ऊसाला आगी लागत असल्याच्या घटना अलीकडे पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीचा बारकाईने विचार करता ऊसाला आग अपघाताने लागत आहेत. की लावल्या जात आहेत, हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे वेळीच तोड करण्यासाठी कारखान्यांना योग्य नियोजन करण्याची गरज आहे
उसाला अवकाळीचा फटका
By admin | Updated: May 19, 2015 00:33 IST