तलाठी देण्याची मागणी
सातारा : भाटमरळी, ता. सातारा हे गाव शेंद्रे मंडलात येत असून या सजास स्वतंत्र तलाठी नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. भाटमरळी सजाचा अतिरिक्त कार्यभार सोनगाव तर्फे साताराच्या तलाठ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे भाटमरळी सजाचे दप्तर दोन ठिकाणी विभागले गेल्याने काम करताना कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
रक्तदान जनजागृती
सातारा : कोरोना लसीकरणाचा वेग सध्या वाढत आहे. लस घेतल्यानंतर दोन महिने संबंधितांना रक्तदान करता येणार नाही. अशा लोकांनी लस घेण्यापूर्वीच रक्तदान केल्यास रक्ताचा तुटवडा भासणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांनी आतापासून शिबिरे घेऊन रक्त संकलनासाठी तसेच लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्याबाबत जनजागृतीसाठी प्रयत्न सुरू आहे.
कुत्र्यांचा बंदोबस्त करा
वडूज : येथील शाळा परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. रात्रीच्यावेळी कुत्र्यांचे टोळके एकत्रितपणे दुचाकी वाहनचालकांवर हल्ला करत आहेत. कु त्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वडूज ग्रामस्थांनी केली आहे.
घंटागाडीचे दर्शन दुर्मीळ
पाटण : येथील बसस्थानक परिसरात घंटागाडी वेळेवर येत नसल्याने रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग झाले आहेत. पाटण बसस्थानक परिसरात राज्यभरातून प्रवाशांचा वावर असतो.
रस्त्यावर खड्डे
सातारा : जुना आरटीओ कार्यालय ते वाढे फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर क़ाही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणाहून जाणाऱ्या दुचाकी वाहनधारकांमध्ये छोटे-मोठे अपघात होत आहेत. नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.