नागठाणे : ‘विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य महाविद्यालय करतेच; परंतु विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळवायचे असेल, तर जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि परिश्रम आदी गुणांबरोबरच विद्यार्थ्यांनी शिस्त, आदर, हुशारी, दूरदृष्टी, कार्यक्षमपणा आणि जबाबदारी या गुणांचा अंगीकार केल्यास आयुष्यात कधीही पाठीमागे वळून पाहण्याची गरज भासणार नाही. व्यक्तिमत्त्व विकासाची मोठी संधी म्हणजे शिक्षण होय. याकरिता विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचा ध्यास असला पाहिजे,’ असे उद्गार सरपंच डाॅ. रूपाली बेंद्रे यांनी काढले.
नागठाणे येथील आर्टस् अँड काॅमर्स काॅलेजमध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ झाला. या समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
कृषिभूषण मनोहर साळुंखे म्हणाले, ‘नागठाणे महाविद्यालय हे स्थापनेपासूनच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य करीत आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच शारीरिक आणि मानसिक विकास साधून ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहावे.’
या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव प्रमाणपत्र, ट्रॉफी, कॉ. गोविंद पानसरेलिखित शिवाजी कोण होता? हे पुस्तक व रोख रक्कम देऊन करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून उपसरपंच अनिल साळुंखे, विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. एस. के, आतार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रा. जयमाला उथळे यांनी सूत्रसंचालन केले. अकॅडेमिक सेलचे प्रमुख डॉ. सुरेश पाटील यांनी आभार मानले.