सातारा : राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाविरोधात पुकारलेल्या संपामध्ये सातारा जिल्ह्यातील बँक कर्मचाऱ्यांनीदेखील मोठा सहभाग नोंदविल्याने सोमवारी बँकांचे कामकाज पूर्णतः ठप्प झाले होते.
आयडीबीआयसह इतर दोन बँकांच्याविरोधात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज फेडरेशनने पुकारलेल्या बंदमुळे सोमवारी सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज बंद राहिले. सलग दोन दिवस बँका दोन दिवस बंद राहणार आहेत. शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या खासगीकरणाच्या निषेधाचे फलक बंद गेटच्या बाहेर पाहायला मिळाले.
आयडीबीआय आणि दोन खासगी बँकांच्या खासगीकरणासंदर्भात सरकारने केलेल्या घोषणेच्या विरोधात बँक कर्मचारी आज आणि उद्या असे दोन दिवस (दि. १५ व १६ मार्च ) संपावर गेल्याने सारेच कामकाज ठप्प राहिले. क्लियरिंग हाऊसेस बंद राहिल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. सातारा जिल्ह्यातील एकवीसशे कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचे एम्प्लॉईज फोरमच्या वतीने सांगण्यात आले.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर म्हणाले, की या संपात राज्यातील दहा हजारापेक्षा जास्त शाखेतून काम करणारे अंदाजे पन्नास हजार बँक कर्मचारी तसेच अधिकारी सहभागी होत आहेत. संपाची सुरुवात सकाळी सहा वाजल्यापासून सेवा शाखा ज्या चेक क्लिअरिंगचे काम पाहतात तेथून होईल. मंगळवारी (१६ मार्च) रात्री बारापर्यंत हे कामकाज बंद राहील. या संपात बँकेत काम करणारे सफाई कर्मचारी ते शाखा व्यवस्थापक अशा सर्व श्रेणीतील अधिकारी सहभागी होत असल्यामुळे संप शंभर टक्के यशस्वी होईल, असा दावा फोरमने केला आहे .
दरम्यान, या संपामध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, नॅशनस कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स आणि बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया आदी संघटना सहभागी होत आहेत.
फोटो ओळ : सातारा शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा सोमवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या. (छाया : जावेद खान)
१५ जावेद