कुडाळ : ‘जवळवाडी ग्रामपंचायत राबवत असलेले उपक्रम कौतुकास्पद असून त्यांच्या विविध उपक्रमांनी सक्षम पिढी घडविण्यास मदत होत आहे. यातून विद्यार्थ्यांना सुसंस्काराचे धडे मिळत आहेत. आयुष्यभर लढण्यासाठी बळ मिळत आहे,’ असे प्रतिपादन मेढ्याचे नगराध्यक्ष पांडुरंग जवळ यांनी केले.
जवळवाडी, ता. जावळी या ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण व गुणवंतांचा सत्कार या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजेंद्र जाधव होते. याप्रसंगी नगराध्यक्षपदी पांडुरंग जवळ, उपनगराध्यक्षपदी कल्पना जवळ यांची निवड झाल्याबद्दल जवळवाडी ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील गौरी शिंदे, सचिन पटवर्धन, श्वेता शरद कुंभार, सानवी शिंदे, आदिती चोरट, श्रावणी गोळे, प्राची सपकाळ, संस्कृती मोरे, मनस्वी देशमुख, इंद्रनील पोळ, तसेच दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांबरोबरच राष्ट्रीयस्तरावर यश संपादन केल्याबद्दल आरीष मुजावर यांचा सन्मान करण्यात आला.
प्रा. सूर्यवंशी म्हणाले, ‘वक्तृत्व स्पर्धा अनेक होतात पण जवळवाडी ग्रामपंचायतीने राबविलेली स्पर्धा निश्चितच आगळी वेगळी होती. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देण्याचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करून सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.’
यावेळी सरपंच वर्षा जवळ, उपसरपंच शंकरराव जवळ, ग्रामसेवक वैभव निकम, सुरेश जवळ, आण्णासाहेब धनावडे, शंकरराव जवळ, बबन जवळ, सुभाष जवळ, सुनील चव्हाण उपस्थित होते. सुरेश जवळ यांनी आभार मानले.
फोटो
जवळवाडी, ता.जावली या ग्रामपंचायतीच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.