कोयनानगर : गुहागर-विजापूर महामार्ग रूंदीकरणाचे नित्कृष्ट काम, पाटण ते घाटमाथा रस्त्याची दुरवस्था व शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला अशा विविध मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हेळवाक येथे सर्वपक्षीय ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. महामार्ग विभाग व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित न आल्याने संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या विनंतीस न जुमानता आंदोलन सुरू ठेवले. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकाची धरपकड करत बत्तीस जणांवर कारवाई करून सोडून दिले.
सामाजिक कार्यकर्ते संपत जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रास्ता रोको आंदोलनात पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे, रवी पाटील, सदानंद साळुंखे, राष्ट्रवादीचे दत्तात्रय कदम, भाजपचे नंदकुमार सुर्वे, मनसेचे दयानंद नलवडे, स्वाभिमानी संघटनेचे विकास हादवे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. आदोलनस्थळी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता महेश तागडे उपस्थित होते. पाटणचे सहायक पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे, कोयना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी यांनी बंदोबस्त तैनात केला होता. तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.
पाटण ते घाटमाथा रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी निम्म्यात काम बंद पडले आहे. यामार्गावरून वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. अनेक वाहनांचा अपघात होऊन काहींना जीव गमवावा लागला आहे, तर शेकडोजण जखमी झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात स्थानिकांनी अनेकवेळा संबंधित विभागाविरोधात निवेदन देत व आंदोलन केले. मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालकांमध्ये तीव्र संताप होता. महामार्ग विभागाने काही दिवसांत काम सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. ते न झाल्याने कोयना भागातील सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी व स्थानिकांनी रास्ता रोको केला.
३२ जणांवर कारवाई
महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता तागडे यानी कामाची निविदा प्रक्रिया झाली असून, लवकरच काम सुरू होईल, असे आश्वासन दिले. मात्र आंदोलकानी वरिष्ठांना उपस्थित करा, अशी मागणी करत आता ठोस कामास सुरुवात करा, अशी मागणी केली. तासभर आदोलन सुरू राहिल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांब रांगा लागल्याने आंदोलन स्थगित करण्यास पोलीस प्रशासन प्रयत्न करत होते. याकडे दुर्लक्ष करत आंदोलन सुरू ठेवल्याने उपस्थित आंदोलकांची धरपकड करत पोलीस ठाण्यात आणले. तेथे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
१२कोयनानगर
गुहागर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर हेळवाक येथे शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ सहभागी झाले होते. (छाया : नीलेश साळुंखे)