मलकापूर : पुण्याहून सावंतवाडीकडे निघालेल्या एस.टी. बसला वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने पाठीमागून धडक दिली. यामध्ये एस.टी.बसचा पाठीमागील पत्रा उचकटला. यामध्ये एस.टी.तील एक प्रवासी व ट्रकचालक जखमी झाला. एस.टी.चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाघटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर येथे आज, शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास पुण्याहून सावंतवाडीकडे एसटी (एमएच १४ बीटी ३९७४) बस निघाली होती. पाठीमागून वाळू भरून येत असलेल्या ट्रक (एमएच १२ ईएफ २५४४) वरील चालकाचा ताबा सुटला. यामुळे ट्रकने एस.टी.ला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये ट्रकचालक सुनील माणिक देवकर (रा. उत्तर कोपर्डे, ता. कऱ्हाड), ध्रुव शशांक फडके (वय २०, रा. पुणे) हे जखमी झाले आहेत. जखमींना मलकापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)
ट्रकची एसटीला धडक
By admin | Updated: September 14, 2014 00:00 IST