नागठाणे : कोरोना व लॉकडाऊन असल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून अनेक सामान्य वारकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. कलाकार, प्रवचनकार, पारायण सोहळे, पायी वारी बंद असल्यामुळे कलाकारांना जगणे असह्य झाले आहे. शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून वारकरी व कलाकारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत करावी, यासाठी सातारच्या तहसीलदार आशा होळकर यांना निवेदन देण्यात आले.
वारकरी साहित्य परिषद, सातारा तालुका तसेच संत तुकाराम महाराज वारकरी संस्था, सातारा, गुरुकुल ज्ञानोबाराय वारकरी संस्था, करंडी आणि अखिल भारतीय वारकरी संस्था, सातारा यांच्यावतीने हे निवेदन देण्यात आले. यावेळी वारकरी साहित्य परिषदेचे सातारा तालुकाध्यक्ष रामदास कदम महाराज तसेच संत तुकाराम महाराज वारकरी संस्थेचे अध्यक्ष संभाजी शेळके, उपाध्यक्ष विकास काटकर, सचिव प्रकाश कुलकर्णी, खजिनदार नंदकुमार माने, गुलाबराव सकटे, रामचंद्र जाधव, रामचंद्र माने, शोभा माने, सतीश गुजर, माजी हिवताप अधिकारी धर्मा गंभरे, मीनल लांजेकर, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे दिंडी व सप्ताह प्रमुख विजय लोहार, दयानंद सुतार, गुरुकुल ज्ञानोबाराय शिक्षण संस्थेचे संस्थाचालक रवी लोहार महाराज उपस्थित होते.