कऱ्हाड : ‘पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण असे यंदाचे बारावे यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन ठरले आहे. या प्रदर्शनात पाच दिवसांत कोल्हापूर, रत्नागिरी, मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भेट दिली. कऱ्हाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गेली अकरा वर्षांपासून कृषी प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनातून शेतकऱ्यांच्या यशोगाथा राज्यभर पोहोचविल्या जातात. या प्रदर्शनातील यश पुढेही टिकून राहावे म्हणून पुढील वर्षापासून संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे,’ असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री, माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केली.बारावे यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर कोळी, जिल्हा परिषद कृषी अधिकारी डॉ. चांगदेव बागल, कऱ्हाड उपविभागीय अधिकारी किशोर पवार, निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी प्रभाकर पाटील, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, शुअरशॉट इव्हेंट मॅनेजमेंटचे अध्यक्ष संदीप गिड्डे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजीराव जाधव, उपसभापती आत्माराम जाधव आदींंसह संचालक उपस्थित होते.माजीमंत्री उंडाळकर म्हणाले, ‘या प्रदर्शनामुळे महाराष्ट्रात क्रांती घडली आहे. आताच्या काळात देशात ६५ टक्के शेतकरी अजूनही शेतीवर अवलंबून आहेत. या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या प्रदर्शनास तरुण शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रदर्शनातील सहभागामुळे त्यांच्या कर्तृत्वाला चालना मिळाली. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचेही शेतीतील कार्य फार मोठे आहे. म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुढील वर्षापासून राज्यातील यशस्वी शेतकऱ्यांला राज्यस्तरीय उत्कृष्ठ शेतकरी पुरस्कार देण्याचा निर्णय कऱ्हाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, ‘कऱ्हाडचे बारावे यशवंतराव चव्हाण कृ षी प्रदर्शन हे यशस्वी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले होते. यावर्षी प्रदर्शनात शेतीप्रगतीविषयी विविध उपक्रम राबविण्यात आले आहे.’ यावेळी जिल्हा अधीक्षक जितेंद्र शिंदे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी यशस्वी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)
यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार
By admin | Updated: November 30, 2015 01:19 IST