जगदीश कोष्टी -- सातारा -खाकी पँट घालायची अन् कोणत्याही एसटीत बसायचं... वाहकानं विचारलंच तर ‘स्टाफ’ असं हात वर करून सांगितलं की झालं... या परंपरेला लगाम घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष शोध मोहीम राबवली आहे. असे कर्मचारी आढळले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.लाखो प्रवाशांना इच्छितस्थळी घेऊन जाण्याचे काम राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीनं आजवर केलं आहे. खासगी प्रवासी वाहतूक (वडाप)शी सामना करत महामंडळ सेवा करत आहे. दरम्यानच्या काळात एसटीला उतरती कळा आली होती. ‘लाल डबा’ म्हणून हिणवला जात असलेल्या एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी खासगीकरणाचा विचार होत होता. मात्र, त्याला एसटी कर्मचाऱ्यांसह समाजातून तीव्र विरोध झाला. हा विचार बाजूला पडला अन् विविध प्रयोग राबविण्यात आले. त्यामुळे महामंडळ फायद्यात आहे.महामंडळाच्या एका सातारा विभागात सुमारे साडेपाच हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे राज्यात लाखो कर्मचारी सेवा बजावत आहेत. कर्मचाऱ्यांना मोफत सेवा ही कधीच दिली जात नव्हती. केवळ कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास करण्यास परवानगी आहे. मात्र, लाखो कर्मचारी केवळ ‘स्टाफ’ असे सांगून आजवर मोफत प्रवास करत आहेत. जर एखाद्या वाहकाने ओळखपत्र मागितले तर त्याला ते दाखवले जाते. वास्तविक पाहता या ओळखपत्रावरून मोफत प्रवास करण्यास परवानगी नाही. तरीही खुलेआमपणे कर्मचारी मोफत प्रवास करत होते. केवळ सहानुभूत दाखवून कारवाई होत नव्हती. तोट्यातील संस्था फायद्यात आणायची तर प्रत्येक कर्मचाऱ्याने ती माझी आहे, असे समजून व्यवहार करणे अपेक्षित असते. खासगी कामासाठीही कर्मचारी मोफत प्रवास करत असतील तर महामंडळ कसे फायद्यात येणार, असा एक मतप्रवाह पुढे येत होता. त्यातून ही मोहीम राबविली जात आहे. भाडं...दंड...कारवाईया मोहिमेत कोणता कर्मचारी खासगी कामासाठी मोफत प्रवास करताना आढळला तर त्याच्याकडून चुकवलेले भाडे वसूल केले जाणार आहे. त्यानंतर तो आढळला तर त्याला दंड केला जाईल. एवढे झाल्यानंतरही कर्मचारी आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. राहत्या घरापासून कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी चाळीस किलोमीटरच्या अंतरासाठी प्रवासपास दिला जातो. त्याशिवाय खासगी कामासाठी मोफत प्रवास करणे योग्य नाही. अनेक कर्मचारी एसटी मुक्कामाच्या ठिकाणी सोडून दुसऱ्या एसटीने गावी येतात. मात्र, त्यांनाही असे करणे नियमबाह्य आहे. त्यामुळे या शोध मोहिमेमुळे फुकट प्रवास करणाऱ्यांना निश्चित चाप बसेल.- विनोद भालेराव,विभागीय वाहतूक अधिकारी, सातारा विभाग
एसटीच्या फुकट्या कर्मचाऱ्यांचा शोध सुरू!
By admin | Updated: April 9, 2016 00:11 IST