सातारा : जलमित्र केवळ माणसांनीच व्हायला हवंय असं कोणी म्हटलंय. एखादी संस्थाही होऊ शकते, याचा प्रत्यय राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातून दाखवून दिला आहे. महामंडळाच्या सातारा विभागाकडे तब्बल आठशे एसटी गाड्या आहेत. या गाड्या दररोज न धुता दोन-तीन दिवसांतून आवश्यकतेनुसार धुण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे दररोज सुमारे एक लाख लिटर पाणी बचत होत आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाकडे आठशे एसटी गाड्या आहेत. प्रवाशांना दररोज चकाचक स्वच्छ गाडी असली तर प्रवास करायलाही आवडते, त्यामुळे या गाड्या नियमित धुण्यावर प्रत्येक आगाराचा प्रयत्न असतो. किमान लांब पल्ल्यांच्या गाड्या धुतल्यानंतरच आगारातून बाहेर काढल्या जातात. त्यामुळे एक गाडी धुण्यासाठी साधारणपणे दोनशे लिटर पाणी सहज लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असते.राज्यभर पडलेला दुष्काळ, पाण्यासाठी चाललेली वणवण पाहून महामंडळाने या गाड्या पाणी वापरात काटकसर करण्याच्या लेखी सूचना सर्व विभाग नियंत्रक व आगार व्यवस्थापकांना केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सातारा विभागानेही केली असून, ते पत्र जिल्ह्यातील अकरा विभागांना पाठविले आहे.या मोहिमेला कर्मचारीही चांगला प्रतिसाद देत आहेत. गाडी खूपच अस्वच्छ झाली असेल तरच धुतल्या जात आहेत. आठशे गाड्या दररोज धुतल्या असत्या तर १ लाख ६० हजार लिटर पाण्याचा वापर झाला असता. मात्र, आता रोज पन्नास टक्केच गाड्या धुतल्या तरी किमान ७५ हजार लिटर पाणी व इतर मार्गाने वाचविलेले असे एकूण सुमारे एक लाख लिटर पाण्याची सहज बचत होत आहे. (प्रतिनिधी)नळांना बसविल्या तोट्या गाड्या धुण्यासाठी सर्वाधिक वापर होत आहे. असे असले तरी सर्व आगार, बसस्थानक, विभागीय कार्यशाळेत कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी, वापरासाठी पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांच्या अनेक नळांना तोट्या नव्हत्या. त्या ठिकाणी तोट्या बसविणे. आगारातील जलवाहिन्यांना गळती असल्यास त्या काढण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे रोज थेंब-थेंब पाण्याची बचत करण्यासाठी एसटीनं पुढाकार घेतला आहे. पाणीबचतीत सर्व आगार सहभागी दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने पाणीबचतीची मोहीम उघडली आहे. यामध्ये सर्वच अकरा आगार सहभागी झाले असून, त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, हे आनंदाची बाब आहे.- विनोदकुमार भालेराव, विभागीय वाहतूक अधिकारी.
‘एसटी’ वाचवतेय रोज एक लाख लिटर पाणी
By admin | Updated: May 23, 2016 00:22 IST