सातारा : राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांसाठी वेळोवेळी विविध योजना आणत असते. मात्र, त्यांचा योग्य प्रचार व प्रसार न झाल्याने या योजनांपासून अनेक प्रवासी वंचित राहतात. त्यामुळे यापुढे लांब पल्ल्याच्या एसटीतील वाहकांनीच प्रवाशांना एसटीच्या विविध योजनांची माहिती द्यावी, अशा सूचना विभागीय कार्यालयाकडून करण्यात आल्या आहेत.राज्य परिवहन महामंडळातर्फे आवडेल तेथे प्रवास, शिक्षणासाठी गावापासून दूर जात असलेल्या मुलींसाठी अहिल्याबाई होळकर योजना, प्रदीर्घ आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना उपचारासाठी बाहेरगावी जावे लागत असल्यास रुग्णाला किंवा वेळप्रसंगी त्याच्या नातेवाइकाला प्रवासात सवलत, विद्यार्थी पास, ठराविक मार्गावर महिनाभर प्रवास करत असल्यास कमी दरात जास्त प्रवास यासारख्या अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांसंदर्भात बसस्थानकात माहिती लावलेली असते; पण ती फारसे कोणी पाहत नाही. त्यामुळे नियमित प्रवास करण्यावरच भर दिला जातो. यामुळे साहजिकच प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. प्रवाशांना एसटी देत असलेल्या विविध योजना, त्यांच्या अटी, नियम, आवश्यक कागदपत्रे यांची माहिती व्हावी, यासाठी एसटीतील वाहकांनीच माहिती द्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या सातारचे विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (प्रतिनिधी)
एसटीच्या योजनांचा वाहक करणार प्रचार!
By admin | Updated: November 2, 2014 00:40 IST