एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’. हल्लीच्या तरुणाईने हा दिवस केवळ प्रेमाच्या आणाभाका घेण्यापुरताच मर्यादित ठेवला असला तरी, अनेकांनी याहीपलीकडे जाऊन निसर्ग, डोंगर-दऱ्या, मुके प्राणी अन् वृक्ष-वेलींवर असलेले प्रेम व्हॅलेंटाईनपेक्षाही अधिक दृढ असल्याचे सिद्ध केले आहे.
श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे राहणारी बनू बाळू पवार ही वृद्धा केवळ पर्यटकांवरील प्रेमापोटी त्यांना मोबदल्याविना पाणी पाजण्याचे काम करीत आहे. पतीचे निधन झाले असले तरी ‘वाघ’ झऱ्यावर या हिरकणीचा माणुसकीचा ‘झरा’ अखंडपणे वाहत आहे.
महाबळेश्वर येथे अनेक ब्रिटिशकालीन पॉईंट आहेत. यापैकी सर्वात मुख्य समजल्या जाणाऱ्या ऑर्थरसीट पॉईंटकडे जाताना लागतो तो ‘टायगर स्प्रिंग्ज’ म्हणजेच ‘वाघ झरा’. ब्रिटिशकालापासून या झऱ्याची ‘टायगर स्प्रिंग्ज’ अशीच ओळख आहे. क्षेत्र महाबळेश्वर येथे राहणारे बाळू रामचंद्र पवार यांनी या झऱ्यावर तब्बल चाळीस वर्षे पर्यटकांना पाणी पाजण्याचे काम केले. कोणत्याही अपेक्षेविना त्यांनी पर्यटकांची सेवा केली. त्यांच्या या कार्यात पत्नी बनू पवार यांचेही वेळोवेळी सहकार्य मिळत होते. भल्या पहाटे उठणं, शिदोरी घेऊन आठ किलोमीटर चालत झऱ्यावर जाणं, झऱ्याची स्वच्छता करून येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची तृष्णा भागविणं, असा त्यांचा दिनक्रम सुरू झाला.
बाळू पवार यांच्या निधनानंतरही बनू पवार यांनी पर्यटकांवरील प्रेम काही कमी होऊ दिले नाही. वयाची सत्तरी पार करूनही त्या नित्यनेमाने आजही ‘वाघ’ झऱ्यावर येऊन पर्यटकांना पाणी पाजण्याचे काम करीत असतात. पतीने चाळीस वर्षांपूर्वी सुरू केलेला माणुसकीचा झरा आज बनू पवार यांच्यारूपानं अखंडपणे वाहत आहे. पाणी पिणारे पर्यटक त्यांना आनंदाने एक-दोन रुपये देऊ करतात. बनू पवार हे पैसे स्वत:चा उदरनिर्वाह अन् औषधोपचारावर खर्च करतात. वार्धक्याकडे झुकूनही बनू पवार यांची सुरू असलेली ही धडपड अनेकांच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालते. ‘व्हॅलेंटाईन डे’ला केवळ एकच दिवस आपण प्रेम व्यक्त करतो. मात्र, बनू पवार यांच्या पर्यटकांवरील प्रेमाला ना कोणते बंधन आहे, ना कोणती सीमा!
फोटो : १२ बनू पवार ०१/०२