सातारा जिल्ह्यात मे महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात १७ शासकीय कोविड सेंटरची स्थापना करण्यात आली. यात सुमारे एक हजार ४६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांना सेंटरमध्ये सोडले की तिथून पुढे त्यांची सगळी जबाबदारी कोविड सेंटर घेत आहे. रुग्णांना सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सर्वकाही तिथेच मिळत असल्याने नातेवाइकांना आहाराची फारशी चिंता सतावत नाही. कोविड सेंटरमध्ये फळांची सोय नसल्याने रुग्णांना फळे आणि संध्याकाळच्या वेळेत चहाबरोबर खायला बिस्कीट, टोस्ट यासाठीच कुटुंबीयांवर अवलंबून राहावे लागते.
जेवण पुरविणाऱ्यांना मेन्यू व जेवणाची वेळ ठरवून दिली आहे. ती गाठण्याचा ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. मात्र, संचारबंदीच्या काळात पुरवठादारांसमोर कच्चा माल व कर्मचाऱ्यांची अडचण असल्याने काहीवेळा जेवण वेळेत मिळायला अडचण होते; पण हे प्रमाण महिन्यातून एखाद्यावेळीच होत असल्याचे सांगितले गेले.
पॉईंटर
जिल्ह्यातील एकूण कोविड केअर सेंटर : १७
या सेंटरमध्ये सध्या दाखल रुग्ण : १४६४
कोट :
कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना वेळेवर आणि सकस आहार मिळावा अशा जिल्हाधिकारी यांच्या सूचना आहेत. ही व्यवस्था चांगल्या पद्धतीने सुरू असून, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्यात आली आहे. जेवणाबाबत कोणाच्या तक्रारी नाहीत; पण कोणी तक्रार केली तर त्याची तातडीने दखल घेतली जाते.
- डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा
चौकट :
जिल्ह्यात सर्वत्रच उत्तम प्रतीचे जेवण
सातारा जिल्ह्यातील सर्वच कोविड सेंटरमध्ये उत्तम प्रतीचे जेवण उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ठरलेल्या वेळेत चहा, नाष्टा आणि जेवण उपलब्ध करून दिले जाते. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील काजू, बदाम घातलेल्या शिऱ्याची चर्चा अवघ्या जिल्ह्यात आहे. नाष्ट्याला शिरा, पोहे, मेदुवडा आणि उप्पीट हा मेन्यू असतो, तर जेवणाला डाळ भात, पालेभाजी, चपाती हे ठरलेले. अनेकदा आठवड्यातून एकदा व्हेज बिर्याणी किंवा पुलावचीही मेजवानी रुग्णांना खायला मिळते. कोणत्याही सेंटरमध्ये मांसाहार दिला जात नाही.
पॉईंटर
चहा : सकाळी ७ - सायंकाळी ५
नाष्टा : सकाळी ७.३० वाजता
जेवण : दुपारी १२.३० - रात्री ७.३० वाजता.