चाफळ : विभागातील बरीचशी गावे डोंगरमाथ्यावर वसलेली आहेत. त्यातीलच जंगलवाडी गाव. येथील ग्रामस्थांना रस्त्यासाठी पिढ्यानपिढ्या वाट पाहावी लागली. मात्र, माजी सार्वजनिक बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर व मंत्री शंभुराज देसाई यांच्या प्रयत्नातून रस्त्याचे काम मार्गी लागले आणि रस्ता गावापर्यंत पोहोचताच ग्रामस्थांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला.
देश स्वतंत्र झाल्यापासून जंगलवाडीकर रस्त्याच्या प्रतीक्षेत होते. त्याला कारणही तसेच होते. गाव छोटे अन् गावाची विभागणी मात्र दोन तालुक्यात. एक गाव, दोन तुकडे अशीच परिस्थिती. एकाच ठिकाणी वसलेलं हे सुमारे चारशे लोकवस्तीचं गाव कऱ्हाड आणि पाटण तालुक्यांत विभागलं गेलंय. त्यामुळे ‘आधे इधर, आधे उधर’ अशी परिस्थिती आहे. यातून मग रस्ता कोणत्या तालुक्याच्या आमदारांनी, कुणी व कुठून करायचा हा मोठा प्रश्न होताच. सध्या मात्र पाटण तालुक्यातील आजी-माजी आमदारांनी आघाडी घेत अखेर रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे.
जंगलवाडीतील ग्रामस्थांना चाफळला आठवडी बाजार किंवा इतर कामासाठी येताना डोंगर कपारीतून वाट शोधत यावे लागत होते. तीन ते चार किलोमीटर पायपीट करावी लागत होती. तसेच बाजारातील साहित्य डोक्यावरून घेऊन जाताना तारेवरची कसरत करावी लागत होती. निवडणुका आल्या की, फक्त आश्वासन मिळण्यापलीकडे त्यांना काही मिळाले नाही. सन २००४ पूर्वी विक्रमसिंह पाटणकर आमदार असताना तत्कालीन पंचायत समिती सदस्य राजेश पवार यांच्याकडे माजी सरपंच अंजना केंजळे, नामदेव माने व त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी साकडे घातले होते. पाटणकरांनी तत्काळ पाठपुरावा करत रस्त्याच्या प्रत्यक्ष कामासाठी लागणारी वन विभागाची परवानगी मिळवत त्यावेळी ६० लाख रुपयांचा निधी देऊ केला. रस्त्याच्या कामास सुरुवात झाली. त्यानंतर २०१४ साली शंभुराज देसाई आमदार झाले. त्यावेळी हरिभाऊ वीर, मुगुटराव केंजळे अशा ज्येष्ठ ग्रामस्थांनी आमदार देसाईंची भेट घेऊन आपली व्यथा त्यांना सांगितली. शंभुराज देसाई यांनीही या कामासाठी अर्थसंकल्पातून निधी मंजूर केला. मात्र, तुर्तास निधी पुरेसा नव्हता. त्यानंतर कोयना भूकंप निधीतून सुमारे ३० लाख रुपये व त्यानंतर २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून पुन्हा एकदा काम सुरू केले.
सद्यस्थितीत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी एकूण ५५ लाख रुपयांचा, तर माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी ६० लाख रुपये निधीची तरतूद करून जंगलवाडी गावात रस्ता पोहोचवला. दोन्ही आजी-माजी आमदारांच्या प्रयत्नातून जंगलवाडीकरांचे जीवनमान नक्कीच उंचावले गेले आहे. बऱ्याच काळानंतर गावात रस्ता पोहोचल्याने ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त होत आहे.
- चौकट
जंगलवाडीतील ग्रामस्थांना रस्ता मिळाला. त्यामुळे शाळकरी मुले, वयोवृध्द ग्रामस्थ, गर्भवती महिला यांची पायपीट थांबली आहे. या रस्त्यासाठी आम्ही अनेक वर्ष पाठपुरावा केला. मंत्री शंभुराज देसाई यांनी या पाठपुराव्याला सहकार्य करीत हा प्रश्न निकाली काढला.
- हरी वीर
ग्रामस्थ जंगलवाडी
- कोट
जंगलवाडी गावच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द विक्रमसिंह पाटणकरांनी दिला होता. तो शब्द त्यांनी खरा करून दाखविला. रस्त्याच्या कामासाठी भरीव निधीसह वन विभागाची परवानगीही मिळवून दिली होती. त्यामुळेच खऱ्या अर्थाने रस्त्याचा प्रश्न सुटू शकला.
- नामदेव माने
ग्रामस्थ, जंगलवाडी
फोटो : ०३केआरडी०२
कॅप्शन : जंगलवाडी, ता. पाटण येथे रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला.