सातारा : दुष्काळी माण तालुक्यातील गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेली ललिता बाबर जिद्दीच्या जोरावर महिलांच्या तीन हजार मीटर स्टीपलचेस क्रीडा प्रकारात रिओ आॅलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत खेळत आहे. तिच्या कामगिरीचा देशवासीयांना अभिमान वाटत आहे. सोशल मीडियावर ललिताला प्रोत्साहन देणारे पोस्ट टाकल्या जात असून, अनेकांनी स्टेटस अन् प्रोफाईल बदलले आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटरवर आजची तरुणाई मोठ्या प्रमाणावर रमत असते. सोशल मीडियावरुन आजच्या तरुणाईच्या मनातील भावना प्रतिबिंबीत होतात. याचाच प्रत्यय सातारकरांमध्ये अनुभवास मिळत आहेत. तीन हजार मीटर स्टीपलचेस माणची कन्या ‘सातारा एक्स्प्रेस’ ललिता बाबर हिची पात्रता फेरी शनिवारी झाली. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीपासूनच फेसबुकवर ललिता बाबर हिचे फोटो टाकले जात होते. पात्रता फेरीत संपल्याबरोबर स्पर्धेतील तिचे फोटो तत्काळ फेसबुक, व्हॉट्सअॅपवर फिरायला लागले. तिच्या अंतिम सामन्यासाठी शुभचिंतन व्यक्त करणारे मेसेज, फोटो टाकले जात होते. सोशल मीडियावरुन एक फेरफटका मारली तर ललिताचेच दर्शन घडत आहे. (प्रतिनिधी) धावते समालोचन काही जणांनी तर चक्क ग्रुपवर सामन्याचे धावते वर्णन केले. स्पर्धा सुरू झाली... ललिता आता पुढे आहे... अरे अरे ती मागे पडली आहे... ती चौथ्या क्रमांकावर आहे. एस... ललिता जिंकली. तिने अंतिम फेरीत धडक मारली, अशा शब्दात सामन्याचे समालोचन केले जात होते.
सोशल मीडियावर फक्त आणि फक्त ललिता!
By admin | Updated: August 15, 2016 00:52 IST