सातारा : भाजप सांस्कृतिक आघाडीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शिवगान स्पर्धा घेण्यात येत आहे. याची प्राथमिक फेरी ही ९ फेब्रुवारी रोजी प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे. तर अंतिम फेरी ही १९ फेब्रवारी रोजी सातारा येथे घेण्यात येत आहे. ही स्पर्धा अजिंक्यतारा किल्ल्याच्या राजसदरेवर होणार असल्याची माहिती भाजप सांस्कृतिक सेलचे पंकज चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
यासाठी संपूर्ण राज्यभरातून ६०० ते ७०० स्पर्धक सहभागी होणार आहेत. ६८ मंडलात या स्पर्धा राज्यभरात राबवित आहोत. यामध्ये सामूहिक व वैयक्तिक अशा दोन विभागात या स्पर्धा होणार आहेत. यामध्ये १२ वर्षांपुढील सर्वजण सहभागी होऊ शकतात. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, प्रवक्ते केशव फरांदे आदी उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या सर्वांची व्यवस्था साताऱ्यात भाजपच्यावतीने करण्यात येणार आहे. ही स्पर्धा विनामूल्य राहणार आहे. या स्पर्धेत वैयक्तिक गायकासाठी किमान ३ ते ७ मिनिटे व सांघिक स्पर्धेसाठी ५ ते ८ मिनिटे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील सामूहिकमध्ये विजेत्या संघास ११ हजार, ७ हजार, ५ हजार तर वैयक्तिक स्पर्धकास ७ हजार, ५ हजार, ३ हजार अशी सहा बक्षिसे राहणार आहेत.
विक्रम पावसकर म्हणाले, अजिंक्यतारा येथे जाण्यासाठी सातारा पालिकेचे पूर्ण सहकार्य राहणार आहे. शिवगान स्पर्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी अजिंक्यतारा येथे होत आहे. शिवगान स्पर्धा ही नागरिकांचा स्वाभिमान जागृत व्हावा, या उदात्त हेतूने होणार आहे. या स्पर्धेच्यानिमित्ताने प्रत्येक जिल्ह्यातून दोन-दोन स्पर्धक येणार आहेत. तरुणांना एक प्रेरणा मिळावी, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी राज्यभरातून पर्यटक वाढणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.