पुसेसावळी : बहिणीचे लग्न एक दिवसावर येऊन ठेपल्याने नारळ आणण्यासाठी मित्राच्या नवीन गाडीवरून निघालेल्या चुलत भावंडांच्या गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी रात्री आठच्या सुमारास झाला. या दुर्घटनेमुळे लग्नघरी शोककळा पसरली आहे. प्रफुल्ल ऊर्फ अमोल सुरेश भोसले, जयदीप जनार्दन भोसले असे ठार झालेल्या चुलत भावंडांची नावे आहेत.घटनास्थळ व भोसले कुटुंबीयांकडून मिळालेली माहिती अशी की, जयदीपच्या बहिणीचे बुधवारी लग्न होते. लग्नाची तयारी झाली होती. विधीसाठी लागणारे नारळ आणण्यासाठी जयदीप (वय २५) व अमोल भोसले (२६) हे मित्राच्या नवीन दुचाकीवरून पुसेसावळीला गेले होते.नारळ खरेदी करून ते परत येताना पुसेसावळी येथील संभाजीनगरजवळ आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुकाकीला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी त्यांना उपचारासाठी कऱ्हाडला हलविले; परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमोल याचा रहिमतपूर येथे गॅरेजचा व्यवसाय होता, तर जयदीप कामानिमित्त दुबईला होता. बहिणाच्या लग्नासाठी तो नागझरी येथे आला होता. या अपघाताची पुसेसावळी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत अद्याप नोंद झाली नव्हती. मंगळवारी सकाळी दोघांचे मृतदेह नागझरीत आणण्यात आले. त्यांच्यावर सकाळी आठच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)
बहिणीच्या लग्नापूर्वीच भावंडांचा मृत्यू
By admin | Updated: May 18, 2016 00:11 IST