मसूर : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने करण्यात आली.
कारखान्याचे सभासद व अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये उसाच्या गव्हाणीचे पूजन करण्यात आले.
प्रथेप्रमाणे हंगामात जास्तीत-जास्त ऊस तोडणी व वाहतूक करून प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या तोडणी मुकादम, वाहतूक कंत्राटदार, बैलगाडीवान, ट्रॅक्टरमालक, ऊस तोडणी मशीन मालक यांना सह्याद्री साखर कारखाना व ऊस तोडणी वाहतूक संस्था यांच्यावतीने रोख रक्कम, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री आणि कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याकडे नोंदवलेल्या संपूर्ण उसाचे गाळप करण्याची परंपरा याहीवर्षी कारखान्याकडून कायम ठेवण्यात येऊन, कारखान्याकडे नोंदविलेल्या संपूर्ण उसाचे गाळप केल्याबद्दल सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, ऊसाने भरलेल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर गाडे आदी ऊस वाहतुकीची शेवटच्या खेपेची वाहने कारखाना कार्यस्थळावर वाजत गाजत दाखल झाली होती. चार-पाच महिन्यांपासून कारखान्याकडे ऊसतोडीचा व्यवसाय करण्यासाठी नातेवाईकांपासून दूर आलेल्या मजुरांची मूळगावी जाण्याची लगबग सुरू झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांच्या आधीन राहून सर्व ऊस वाहतूक व तोडणी मजुरांना त्यांच्या राहत्या गावी पाठवण्याची प्रक्रिया कारखाना व्यवस्थापनाने पूर्ण केली आहे.
यावेळी कारखान्याचे सभासद, अधिकारी, ऊसतोडणी मजूर, वाहतूक कंत्राटदार सोशल डिस्टन्स ठेवून उपस्थित होते.
जगन्नाथ कुंभार यांनी फोटो मेल केला आहे.