शिरवळ : कोरोनाला रोखण्यासाठी शिरवळमध्ये शनिवारी सायंकाळी पाचपासून संचारबंदी लागू केली. बाजारपेठेत सर्व व्यवहार सुरळीत सुरू असतानाच सायंकाळी पाच वाजता पोलिसांची गाडी सायनर वाजवत फिरू लागली अन् दुकानं बंद होऊ लागली. पाहता पाहता बाजारपेठेत शुकशुकाट जाणवू लागला.
याबाबत माहिती अशी की, सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार बुधवार, दि. ३१ मार्चपर्यंत शिरवळसह लोणंद याठिकाणी दोन टप्प्यामध्ये संचारबंदीची अंमलबजावणी सुरू आहे. दुसरीकडे प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिरवळ ग्रामपंचायतीमध्ये बैठक घेत अचानकपणाने शिरवळ ग्रामपंचायतीकडून २७ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या आदेशामुळे शिरवळमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेमध्ये तोबा गर्दी केली होती. राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वपूर्ण बाजारपेठ म्हणून शिरवळचा नावलौकिक संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडाळ्याच्या तत्कालीन सहायक जिल्हाधिकारी मनीषा ओव्हाळ यांनी शिरवळसह लोणंद याठिकाणी दोन टप्प्यामध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. दरम्यान, शिरवळ ग्रामपंचायत इमारतीमध्ये शुक्रवारी काही अधिकारी व स्थानिक ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक झाली. काही वेळानंतर सोशल मीडियावर शिरवळ ग्रामपंचायतीचा स्वाक्षरी नसलेला व केवळ शिक्का असलेल्या आदेशाची प्रत फिरू लागली. यामध्ये शनिवार दि. २७ मार्च ते मंगळवार दि. ६ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णपणे बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये स्पीकरवरून ग्रामपंचायतीमार्फत दवंडी फिरू लागल्याने शिरवळमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अवघ्या दोन तासांमध्ये शिरवळच्या भाजी मंडईसह बाजारपेठेमध्ये गर्दी झाली होती.
चौकट
शिरवळमध्ये ५४ कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये
शिरवळसारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये केवळ ५४ कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्याची बैठकीमध्ये माहिती दिली असल्याची माहिती एका ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. त्यामुळे शिरवळ अकरा दिवस बंद ठेवण्याचा मोजक्याच पदाधिकाऱ्यांमध्ये निर्णय घेतल्याने शिरवळमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. कोरोना रोगाच्या उपाययोजनेकरिता शिरवळ ग्रामपंचायत याठिकाणी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आल्याचा निरोप ग्रामपंचायत सदस्यांना मिळाला असताना सकाळी दहा वाजताच बैठक मोजक्याच अधिकारी व पदाधिकारी यांनी घेत हा निर्णय थोपवल्याचा आरोप केला आहे.