म्हसवड : ‘कोरोना महामारीचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर वाढला असताना आमदार जयकुमार गोरे रात्रंदिवस मैदानात उतरून काम करीत आहेत. त्यांचे दातृत्व, कर्तृत्व आणि जनतेविषयीची तळमळ मोठी आहे. त्यांनी सुरू केलेल्या प्रत्येक कोरोना उपचार केंद्रांना लागेल ती मदत करीत आहे,’ अशी ग्वाही खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले.
आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून म्हसवड येथे सुरू होत असलेल्या कोरोना उपचार केंद्राच्या तयारीची पाहणी करताना ते बोलत होते. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, जयकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते अकिल काझी, नितीन दोशी, डॉ. मासाळ, सिद्धार्थ गुंडगे, डॉ. कोडलकर, सुरेश म्हेत्रे, राजेंद्र कोले, धनाजी माने, गणेश केसरकर, रामचंद्र नरळे उपस्थित होते.
खासदार निंबाळकर म्हणाले, ‘माण-खटाव मतदारसंघात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असताना बाकीचे नेते या कठीण काळात गायब झाले आहेत. आमदार गोरे रुग्णांच्या मदतीसाठी कायमच तत्पर राहत आहेत. मायणी मेडिकल कॉलेजमध्ये हजारो रुग्णांवर उपचार केले जात आहेत. इतरांना ऑक्सिजन पुरविण्याचे कामही ते करीत आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात आवश्यक त्या ठिकाणी रुग्णांना मदत मिळवून देत आहे.’
आमदार जयकुमार गोरे म्हणाले, ‘म्हसवड परिसरात ऑक्सिजन बेड्सची कमतरता भासत असल्याने आम्ही पन्नास ऑक्सिजन आणि पन्नास साधारण बेडचे उपचार केंद्र सुरू करीत आहोत. या केंद्रात जनरेटर, रुग्णांचे जेवण, नाष्टा आणि उपचारांची व्यवस्था आम्ही करीत आहोत. वैद्यकीय स्टाफची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नगरसेवक, कार्यकर्ते, स्वयंसेवक म्हणून काम करीत आहेत. मायणी मेडिकल कॉलेजचा स्टाफही येथे कार्यरत होणार आहे. खासदार निंबाळकर आम्हाला लागेल ती मदत करीत आहेत. ऑक्सिजन लाईनसाठी त्यांनी तत्काळ निधीही उपलब्ध करून दिला आहे. पहिल्या लाटेप्रमाणेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माझ्या मतदारसंघातील जनतेची सेवा करण्यासाठी रात्रंदिवस तत्पर आहोत.’
फोटो ०३म्हसवड-निंबाळकर
म्हसवड येथील कोरोना उपचार केंद्राच्या कामाची खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांनी पाहणी केली.