लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा नगरपालिकेने विशेष सभा बोलावून शाहूनगर त्रिशंकू भागातील ७ सप्टेंबर २०२० पर्यंतची बांधकामे नियमित करण्याचा ठराव मंजूर करून तो शासनाला पाठवावा, अशी मागणी अॅड. सचिन तिरोडकर यांनी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, सातारा पालिकेची ७ सप्टेंबर २०२० रोजी हद्दवाढ झाली. हद्दवाढीत शाहूनगर त्रिशंकू भाग, विलासपूर, शाहूपुरी ग्रामपंचायत व खेड ग्रामपंचायतींचा काही भाग समाविष्ट झाला आहे. यापैकी शाहूनगर त्रिशंकू भाग हद्दवाढीत येण्यापूर्वी येथे कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नव्हती. उर्वरित शाहूपुरी, विलासपूर व खेड या ठिकाणी ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या.
शाहूनगर त्रिशंकू भाग वगळता उर्वरित भागात बांधकाम मंजुरी, त्यांचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. त्यामुळे शाहूनगर त्रिशंकू भागातील बांधकामांचा ८ अ चा उतारा, मिळकतींचा नकाशा, आरसीसी डिझाईन, बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र, पूर्णत्वाचा दाखला अशी कागदपत्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे या मिळकतींना अनधिकृत बांधकामे म्हणता येणार नाही. या सर्व मिळकतींना आर्किटेक्ट, इंजिनिअर यांचे हमीपत्र मिळणे प्रत्यक्षात शक्य नाही.
या सर्व बाबींची पडताळणी करून सातारा पालिकेने शाहूनगर त्रिशंकू भागातील ७ सप्टेंबर २०२० पर्यंतची सर्व बांधकामे विकसन शुल्क, कंपौंडिंग शुल्क न आकारता सरसकट नियमित करावीत, यासाठी विशेष सभा घेऊन ठराव मंजूर करावा, अशी मागणी तिरोडकर यांनी केली आहे.