दहिवडी : दहिवडी शहरातील मुख्य बाजारपेठेतील बंद घरे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी फोडली आहेत. त्यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेला असून या घटनेमुळे दहिवडी शहरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत माहिती अशी की, दहिवडी शहरातील चौकाशेजारी असलेल्या अक्षय केशव पवार यांच्या घराचे रंगकाम सुरू आहे. अक्षय पवार शनिवारी रात्री दहाच्या सुमारास दुसऱ्या खोलीत झोपी गेले असताना या घरातून एलआयसीची जमा करून घरात ठेवलेली दीड लाख रुपयांची रोकड तसेच २० ग्रॅमचे गंठण, दोन डोरली, टाॅप बदाम असे २० ग्रॅम ९६ हजार रुपये किमतीचे दागीने असा २ लाख ४६ हजार रुपयांचा सोने व रोकड चोरीस गेली आहे. याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरुद्ध देण्यात आली आहे. सकाळी ही माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामे केले आहेत तसेच साताऱ्यावरून श्वानपथकही घटनास्थळी चोरांचा मागोवा घेण्यासाठी बोलवण्यात आले होते. मात्र, अद्याप माहिती कळू शकली नाही. याशिवाय दहिवडी शहरातील मीना केशव पवार, अशोक बबन पवार, तेजस नारायण पवार,
सोमनाथ पवार, महादेव जानकर, संजय कदम, सुहास काशीद यांच्या बंद घरे तसेच छोटी दुकाने चोरांनी कुलूपबंद तोडून किरकोळ साहित्य चोरले आहे. याची दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. दहिवडीचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करत आहेत.