तरडगाव : तरडगाव येथे कोरोनाने कहर वाढला असून दिवसेंदिवस बाधितांची संख्याही वाढतच आहे. गावातील प्रत्येक भागात रुग्ण आढळत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी तरडगावमध्ये सोमवारी बैठक घेतली. यावेळी संपूर्ण गाव कोरोना प्रतिबंध क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. सोमवारपासून सात दिवस कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला.
गेल्या काही दिवसांमध्ये गावातील कोरोनाची संख्या भलतीच वाढून ती सध्या एकूण ६७ इतकी झाली आहे. तीन दिवसांपूर्वी एका आश्रमातील कोरोना बाधितांची आकडेवारी समोर येताच सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले आहे. वाढत्या रुग्णसंख्येला अटकाव म्हणून ग्रामपंचायतीसह विविध विभागांतील पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत उपाययोजनांबाबत चर्चा झाली.
दरम्यान, गावातील सर्व व्यावसायिकांनी कोरोना तपासणी करून घेणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले. प्रतिबंध क्षेत्रातील गावातील व्यक्तींनी बाहेरगावी कामासाठी जाऊ नये, परगावाहून गावात येण्यास देखील मनाई करण्यात आली आहे तसेच या काळात लग्नसमारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रम घेता येणार नाहीत. यामुळे ते रद्द करावेत, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या आहेत.
यावेळी गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, लोणंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कदम, सरपंच जयश्री चव्हाण, उपसरपंच प्रदीप गायकवाड, पोलीस पाटील भरत अडसूळ, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब धायगुडे, मंडलाधिकारी टी. बी. भांगे, सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार शहा, संदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गायकवाड, बाळासाहेब मोहिते, अतुल गायकवाड, दीपक गायकवाड, संतोष कुंभार आदी उपस्थित होते.
चौकट
लोकांनी धीराने सामोरे जावे
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत कोरोनाची साखळी लवकर तुटणे आवश्यक आहे. ही जबाबदारी सर्वांची आहे. प्रशासन आपल्या परीने जंतुनाशक फवारणी, आरोग्य तपासणीसारख्या उपाययोजना करत आहे. जनतेने न भीता आलेल्या संकटास नियमांचे काटेकोरपणे पालन करत सामोरे जात सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.
फोटो १५तरडगाव
तरडगाव येथे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्शवभूमीवर प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी बैठक घेतली. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कदम उपस्थित होते. (छाया : सचिन गायकवाड)
( सचिन गायकवाड, तरडगाव)