वाई : वाई औद्योगिक वसाहतीतील वाढती गुन्हेगारी व महिला कामगारांच्या सुरक्षिततेसाठी येथे पोलीस चौकी उभारावी, अशी मागणी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे, वाई औद्योगिक वसाहतीत लॉकडाऊन काळात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. कोरोना साथीमुळे एमआयडीसीत काम करणाऱ्या महिला कामगारांची संख्याही वाढली आहे. विविध कंपन्यांमध्ये परराज्यातील कामगार काम करतात. त्यांची नोंद प्रशासनाकडे नाही. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेसाठी तसेच भविष्यात घडणाऱ्या मोठ्या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी वाई औद्योगिक वसाहतीत पोलीस चौकी सुरु करावी.
यावेळी तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष मयूर नळ, शहराध्यक्ष विश्वास सोनावणे, योगेश फाळके, मयूर सणस, अजित शिंदे, दीपक भडंगे, दीपक मांढरे, प्रवीण महांगडे, अभिजीत चव्हाण, आदी उपस्थित होते.