कुडाळ : जावळी तालुक्यातील हुमगाव येथील माध्यमिक विद्यालयात ३० बेडचे विलगीकरणक कक्ष उभारले असून, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असून, हे सेंटर तालुक्यात आदर्श ठरावे, असे मत माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
हुमगाव, ता. जावळी येथील विलगीकरण केंद्राचे उद्घाटन व रुग्णवाहिका लोकार्पणप्रसंगती ते बोलत होते. यावेळी जावळीचे उपविभागीय अधिकारी सोपान टोनपे, तहसीलदार राजेंद्र पोळ, तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते, पोलीस निरीक्षक अमोल माने, उपनिरीक्षक महेश कदम मोहिते, शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख कमलाकर भोसले, बुवासाहेब पिसाळ, वैशालीताई शिंदे, हुमगावच्या सरपंच प्रियंका शिंदे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थितीत होते.
माजी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, कोरोना काळात जावळीच्या जनतेला आरोग्याच्या मूलभूत सुविधांची कमतरता भासू देणार नाही. आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. कोरोनाबाधितांसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी आपणा सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणेचे काम योग्य पद्धतीने सुरू असून, कोणीही आजार लपवू नये. गावोगाव टेस्टिंग वाढवाव्यात यासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वांनी सहकार्य करावे. या विलगीकरण कक्षासाठी सर्वांनीच आपले योगदान द्यावे.
फोटो : हुमगाव, ता. जावळी येथे माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते विलगीकरण कक्षाचे उद्घाटन व रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.