सातारा : अजिंक्यतारा किल्ल्यावर येणाऱ्या शिवभक्त व पर्यटकांची संख्या लक्षात घेता, पायथ्याशी असलेल्या मंगळाई देवी मंदिराच्या आवारात सेल्फी पॉईंट उभारण्यात यावा, अशी मागणी अॅड. सचिन तिरोडकर यांनी केली आहे.
याबाबत पालिका नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी व बांधकाम सभापती यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, सातारा शहराला अजिंक्यतारा किल्ल्याच्या रूपाने ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा किल्ला पूर्वी पालिका हद्दीत येत नव्हता. मात्र, हद्दवाढीमुळे तो आता पालिकेच्या हद्दीत आला आहे. या किल्ल्यावर दररोज सकाळी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. शिवाय पर्यटक व शिवभक्तांचीही किल्ल्यावर रेलचेल सुरू असते. या सर्वांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मंगळाई देवी मंदिराच्या आवारात व शाहूनगर येथील एसटी कॉलनीत सेल्फी पॉईंट उभारण्यात यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.