लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात २००३ पासून ८६४ कंत्राटी ग्रामसेवक नियुक्त झाले असून, त्यानंतर तीन वर्षांनी बहुतांशीजणांना सेवेत नियमित करण्यात आले. यामध्ये २०१२ पासून शासकीय सेवेत आलेल्यांपैकी २९१ जणांना त्यांची १० हजारांची सुरक्षा ठेव रक्कम परत करण्यात आलेली आहे.
शासकीय सेवेत काही ठिकाणी कंत्राटी नोकर भरती होत असते, तर जिल्हा परिषदेंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक म्हणून रुजू होताना प्रत्येक उमेदवाराकडून १० हजारांची रक्कम सुरक्षा म्हणून घेण्यात येते. तीन वर्षांनंतर काम पाहून संबंधितांना शासकीय सेवेत नियमित करण्यात येते. कंत्राटी ग्रामसेवक असताना सहा हजार रुपये मानधन आणि ११०० रुपये प्रवास भत्ता देण्यात येतो, तर सेवेत नियमित झाल्यावर शासन नियमानुसार वेतन मिळते.
जिल्ह्यात २००३ पासून आतापर्यंत ८६४ कंत्राटी ग्रामसेवक नियुक्त झाले. त्यामधील ६४७ जणांना नियमित करण्यात आले, तर सेवेत नियमित झाल्यानंतर २०१२ पासून २९१ ग्रामसेवकांना १० हजारांची अनामत रक्कम परत करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात एकूण ग्रामसेवक
७६९
कंत्राटी ग्रामसेवक
१७
चौकट :
९५ ग्रामसेवक नियमित सेवेत समाविष्ट...
मागील पाच वर्षांत ९५ कंत्राटी ग्रामसेवकांना शासकीय सेवेत नियमित करण्यात आले आहे. २०१६ साली ४४ जण नियमित झाले, तर २०१४ ला १६, २०१८ ला १५ आणि २०१९ ला २० जणांना कंत्राटीपदावरून कायमस्वरूपी ग्रामसेवक म्हणून सेवेत घेण्यात आले. २०२० या वर्षात एकालाही कायम करण्यात आले नाही. तर सुरक्षा ठेव रक्कम परत करताना नियमित सेवेत झालेल्या ग्रामसेवकांनी प्रस्ताव द्यायचा असतो. तो स्थायी समिती सभेत मंजूर झाल्यानंतर आदेश होऊन संबंधितांना पैसे परत केले जातात. जिल्ह्यात ग्रामसेवकांची ८४४ पदे मंजूर असली तरी सद्य:स्थितीत ७६९ जणच कार्यरत आहेत. काही ग्रामसेवकांकडे तर अनेक गावांचा कार्यभार असतो.
चौकट :
कंत्राटी ग्रामसेवक म्हणून नियुक्त होताना सुरक्षित ठेव घेतली जाते. तीन वर्षांनंतर कामकाजाची तपासणी होते. त्यानंतर ग्रामसेवक म्हणून शासकीय सेवेत कायम केले जाते. सेवेत आल्यानंतर घेतलेली सुरक्षित रक्कम दिली जाते. हा शासन नियम आहे, असे ग्रामसेवक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
कोट :
शासन नियमाप्रमाणे कंत्राटी ग्रामसेवक म्हणून रुजू होताना सुरक्षा ठेव म्हणून रक्कम जमा करण्यात येते. तीन वर्षांनंतर नियमित झाल्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेने संबंधितांना ही सुरक्षा ठेव रक्कम वेळोवेळी परत करण्यात आलेली नाही.
- अविनाश फडतरे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)
...........................................................