सातारा : येथील शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती आणि राज्यातील विविध १८ संस्थांच्या वतीने महाराष्ट्रातील दुसरे दुर्ग संमेलन खटाव तालुक्यातील किल्ले वर्धनगड येथे दि. १५ व १६ नोव्हेंबरला होत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तसेच या संमेलनात निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, नितीन बानुगडे-पाटील, प्रमोद मांडे आदींची उपस्थिती राहणार असल्याचेही सांगण्यात आले.येथील पत्रकार परिषदेत आयोजकांनी ही माहिती दिली. यावेळी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील, कार्यप्रमुख सुदाम गायकवाड, निमंत्रक दीपक प्रभावळकर, प्रा. के.एन. देसाई, अजय जाधवराव, वर्धनगडचे सरपंच अर्जून मोहिते आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील पहिले दुर्ग संमेलन सदाशिवगड येथे झाले होते. दुसरे संमेलन किल्ले वर्धनगडावर होत आहे. दि. १५ व १६ नोव्हेंबरला हे संमेलन होत आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील आहेत. उद्घाटक दुर्ग महर्षी प्रमोद मांडे हे आहेत. त्याचबरोबर आमदार शशिकांत शिंदे व मठाधिपती सुंदरगिरी महाराज हे कार्याध्यक्ष असून, कार्यप्रमुख अर्जुन मोहिते, सुदाम गायकवाड आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात अनेक मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ इतिहास संशोधक निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे, दुर्गप्रेमी प्र. के. घाणेकर, ज्येष्ठ दुर्ग संरक्षक मिलिंद क्षीरसागर, शस्त्रास्त्र संग्राहक व अभ्यासक गिरीशराव जाधव, शिवप्रेमी अभ्यासक अजय जाधवराव, दुर्ग लेखक प्रा. कुलदीप देसाई, पुरातत्वीय संशोधक डॉ. सचिन जोशी, व्याख्याते इंद्रजित सावंत, इंद्रजित देशमुख, चित्रपट लेखक प्रताप गंगावणे आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित राहणार आहेत. संमेलनात सहभागी होणाऱ्यांना कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. त्यांनी मोबाइलवरून नावनोंदणी करणे आवश्यक आहे. दोन दिवसांच्या या संमेलनात दि. १५ रोजी सकाळ नावनोंदणी व स्वागत असा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर किल्यावर चढाई, दुर्गपूजन, ध्वजपूजन कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर उद्घाटन होऊन व्याख्यानाचे कार्यक्रम होणार आहेत. रात्री शाहिरी व मर्दानी खेळ आणि जागर कार्यक्रम होणार आहेत. दि. १६ रोजी सकाळी स्पर्धा होणार असून, त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी चर्चासत्र तर दुपारी संमेलनातील ठराव व सांगता समारंभ होणार आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)साताऱ्यात मोठे दुर्ग वैभव...नव्या पिढीला गड-किल्यांची ओळख व्हावी. येथील समृद्ध इतिहास समजावा. स्वराज निर्माण कसे झाले ते कळावे, यासाठी अशा संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यात मोठे दुर्ग वैभव आहे. तेही समोर यावे, यासाठी किल्ले वर्धनगडावर दुसरे दुर्ग संमेलन घेण्यात आले आहे. यापुर्वीचे संमेलन सदाशिवगड येथे झाले होते. यावर्षीच्या संमेलनात राज्यातील सुमारे १८ संस्था सहभागी झाल्या आहेत. दरवर्षी दुर्ग संमेलनाला प्रतिसाद वाढत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नवीन पिढीपुढे यावा यासाठी दुर्ग संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाचे दुसरे दुर्ग संमेलन सातारा जिल्ह्यातील किल्ले वर्धनगडवर होत आहे. ही गोष्ट जिल्ह्याच्यादृष्टीने अभिमानास्पद अशीच आहे. - नितीन बानुगडे-पाटीलछत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नवीन पिढीपुढे यावा यासाठी दुर्ग संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाचे दुसरे दुर्ग संमेलन सातारा जिल्ह्यातील किल्ले वर्धनगडवर होत आहे. ही गोष्ट जिल्ह्याच्यादृष्टीने अभिमानास्पद अशीच आहे. - नितीन बानुगडे-पाटील
किल्ले वर्धनगडवर दुसरे दुर्ग संमेलन
By admin | Updated: November 6, 2014 00:03 IST