कऱ्हाड : कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक दुरंगी होण्याचेच संकेत मिळत आहेत. १९ जागेसाठी १२२ अर्ज दाखल झाले असले तरी अंतिम क्षणी ३८ अर्ज राहतील, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे बाजार समितीत पुन्हा सत्तांतर होणार की सत्ता अबाधित राहणार, याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे.सुमारे सहा वर्षांपूर्वी कऱ्हाड तालुक्याच्या राजकारणात गटतट व पक्ष बाजूला ठेवत आमदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाआघाडी आकाराला आली. बाजार समितीवर प्रदीर्घ काळ उंडाळकरांची असणारी सत्ता उलथवून टाकण्यात या आघाडीला यश आले. त्यानंतर जिल्हा बँकेवर असणारे उंडाळकरांचे वर्चस्वही संपले. तर विधानसभेलाही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.विधानसभेनंतर मात्र तालुक्याच्या राजकारणात उंडाळकर-भोसले नव्या मैत्रिपर्वाला सुरुवात झाली असून, कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत त्याला यशही मिळाले आहे. त्यामुळे या मैत्रिपर्वाला आता बाजार समिती खुणवू लागली आहे. कुठल्याही परिस्थितीत बाजार समितीची सत्ता हस्तगत करायची यासाठी उंडाळकर पितापुत्रांनी फिल्डिंग लावली आहे. तर कारखाना निवडणुकीत हातभार लावलेल्या उंडाळकरांच्या ऋणातून उत्तराई व्हायचं, ही डॉ. अतुल भोसले गटाची मानसिकता आहे. त्यामुळे हे मैत्रिपर्व चांगलेच कामाला लागले आहे. याऊलट सत्ताधारी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखालील आघाडी ही कामाला लागली आहे.माजी मुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील यांच्यासह उंडाळकर विरोधकही एकवटले आहेत. त्यांनीही शेवटच्या दिवशी आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करून ‘हम भी हैं जोश में’ हे दाखवून दिले आहे. १९ जागेसाठी १२२ अर्ज दाखल आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी ३० जुलै पर्यंत अवधी असल्याने राजकीय आखाडे बांधत आपापल्या पॅनेलचे उमेदवार निश्चित करण्यास अडसर येणार नाही. बाजार समितीची निवडणूक आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडी विरुद्ध माजी आमदार विलासराव पाटील व डॉ. अतुल भोसले यांचे संयुक्त पॅनेल यांच्यात होणार, हे निश्चित! यात कोण बाजी मारणार याची सध्या तालुक्याच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा आहे. (प्रतिनिधी)कृषी प्रक्रिया मतदारसंघ रिक्त...कृषी प्रक्रिया मतदार संघासाठी उंब्रजच्या महेशकुमार जगन्नाथ जाधव व मलकापूरच्या मनोहर भास्करराव शिंदे यांचे अर्ज दाखल झाले होते. सर्वच अर्जांची छाननी झाली. यावेळी महेशकुमार जाधव व मनोहर शिंदे यांच्या अर्जामध्ये अनुमोदक नसल्याने ते अवैध ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे कृषी प्रक्रिया मतदारसंघ रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या निवडणुकीकडे लक्ष लागून राहिले आहे.
बाजार समितीसाठी दुरंगी लढत!
By admin | Updated: July 16, 2015 20:42 IST