लोकमत इफेक्ट...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा परिषदेतील बोगस अभियंत्ये शोधण्यासाठी तयार करण्यात आलेल्या समितीने सोमवारी १५ जणांकडून शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे घेतली. संशयास्पद प्रमाणपत्रे संबंधित विद्यापीठाकडे पाठवून पडताळणी करण्यात येणार आहे. शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी सुरू झाल्याने अभियंत्यांत चलबिचल सुरू झाली आहे.
सातारा जिल्हा परिषदेत कार्यरत काही शाखा व कनिष्ठ अभियंत्यांच्या शैक्षणिक अर्हतेवर साताऱ्यातील माहिती अधिकारी कायकर्ते संतोष शेंडे यांनी शंका उपस्थित केली आहे. यासाठी विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन अभियंत्यांची शैक्षणिक कागदपत्रे तपासणीची मागणी केली होती. तर शेंडे यांनी माहिती अधिकारात अभियंत्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या सत्यप्रती मागतिल्या होत्या. त्यानंतर अनेकांच्या प्रती मिळाल्या. मात्र, काही अभियंत्यांच्या शैक्षणिक कागदपत्रात विसंगती दिसून आली, असे शेंडे यांचे म्हणणे आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मार्च महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत काही सदस्यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडला.
मागील महिन्यात १५ जूनला झालेल्या सभेतही सदस्यांनी या मुद्यावरून प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर प्रशासनाने एक समिती तयार करून चौकशी करणार आहे, असेही सभागृहात स्पष्ट केले होते. आता ही समिती गठीत करण्यात आली आहे. सोमवारी १५ अभियंत्यांनी शैक्षणिक कागदपत्रांच्या सत्यप्रती समितीकडे सुपुर्द केल्या. आता ही समिती सत्यप्रतींची तपासणी करणार आहे.
चौकट :
अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देणार...
जिल्हा परिषदेत जवळपास १३० हून अधिक शाखा व कनिष्ठ अभियंते कार्यरत आहेत. यामधील १० टक्के अभियंत्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानुसार समितीने सोमवारी १५ अभियंत्यांना शैक्षणिक कागदपत्रांच्या सत्यप्रती घेऊन बोलविले होते. त्यानुसार अभियंते हजर झाले. त्यांनी समितीकडे कागदपत्रे सादर केली. आता ही समिती कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल देणार आहे.
.................................................................