लोणंद : खंडाळा तालुक्यातील बोरी गावामध्ये नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी महिलांमध्ये शिव्यांचे द्वंद्व रंगले. हे आगळे-वेगळे घमासान पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राभरातून लोक याठिकाणी दाखल झाले होते. सुखेड व बोरी गावांदरम्याच्या ओढ्यात गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन्ही गावांतील शंभर ते दीडशे महिलांनी हातवारे करून शिव्या देऊन पारंपरिक पद्धतीने व रितीरिवाजानुसार बोरीचा बार साजरा केला. दरवर्षीप्रमाणे सुखेड व बोरी गावच्या महिला हातवारे करून एकमेकांना शिव्या देऊन बार घालतात. सकाळपासूनच दोन्ही गावांच्या मध्ये ओढ्याच्या काठावर लोकांनी बोरीचा बार पाहण्यासाठी गर्दी केली होती. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बोरी गावातील महिला ग्रामदैवताची पूजा करून ओढ्याच्या काठी वाजत-गाजत आल्या. दुसऱ्यात सुखेड गावातील महिला ग्रामदेवतेचे व वारुळाचे पूजन करून ओढ्याच्या काठावर आल्या. साधारण अर्धा तास बोरीचा बार सुरू होता. पाऊस नसल्याने ओढ्यात पाणीही नव्हते; त्यामुळे कोरड्या ठाक ओढ्याच्या काठावरून एकमेकांना शिव्या घालणाऱ्या या महिलांना आवरताना पोलिसांची दमछाक झाली. यावर्षी खंडाळा तालुका तहसील कार्यालय व लोणंद पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुताई सपकाळ यांचे व्याख्यान आयोजित केले होते. बोरी व सुखेड गावांना यात्रेचे स्वरूप आले होते. मिठाईची दुकाने, पाळणे, खेळणी तसेच खाद्य पदार्थांची दुकाने दोन्ही गावांत लागली होती. दोन्ही गावांत सहायक पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)
कोरड्या ओढ्यात शिव्यांचा महापूर
By admin | Updated: August 20, 2015 21:48 IST