सातारा : आवक कमी असल्याने कांदा चांगलाच भाव खाऊ लागला आहे. साताऱ्यात चांगल्या कांद्याची विक्री ६० रुपये किलोने होऊ लागली आहे. त्यातच मिरचीही भाव खात असून, गवार अन् भेंडीचाही दर वाढला आहे.
सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून शेतमाल येतो. यामध्ये कांदा आणि बटाट्याची आवक अधिक राहते, तर पालेभाज्यांचीही आवक होते. या बाजार समितीतील शेतमाल मंडईधारक, किरकोळ दुकानदार खरेदी करून विकतात. त्यामुळे बाजार समितीपेक्षा बाहेर दर अधिक राहतो.
सातारा बाजार समितीत मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक वाढली आहे. तसेच दरही वाढले आहेत. कांद्याला क्विंटलला चार हजारांपर्यंत भाव मिळत आहे. बाजारात कांदा अपुरा पडत आहे. त्यामुळे कांद्याची किरकोळ विक्री किलोला ४० रुपयांच्या पुढे आहे. साताऱ्यात तर एक नंबर कांदा ६० रुपये किलोने विकला जात आहे. कांद्याची आवक कमी राहिली तर दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मंडईमध्ये हिरवी मिरचीही तिखट झाली आहे. कारण दर वाढू लागलाय. तिखट मिरचीचा किलोचा दर ८० रुपयांवर गेला आहे. तर कमी तिखट असणारी मिरची ६० रुपयांदरम्यान आहे. गवार आणि भेंडीही महाग होत चालली आहे. गवार ६० ते ८० आणि भेंडी ८० रुपये प्रतिकिलो विकली जात आहे. शेवगा शेंगही ८० रुपये किलो आहे.
काही भाज्यांचे दर वाढत असताना वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवरचे दर कमी आहेत. कोबीचा एक गड्डा १० रुपयांना मिळत आहे. वाटाणा अन् दोडका विक्री ४० रुपये किलोने होऊ लागली आहे, तर लसणाचा दर वाढलेलाच आहे.
कोट :
मागील आठ दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. आवक कमी असल्याने ही वाढ दिसून येत आहे. तर मिरची, लसणाचाही भाव वाढत चालला आहे. मात्र, कोबी, टोमॅटोचे दर अजूनही कमी आहेत. वाटाण्यालाही कमी भाव आहे.
- इम्रान बागवान, भाजीपाला विक्रेता, सातारा
फोटो दोन कॉलम आहे...
.........................................................................