लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेला ढोबळ करपूर्व नफा रु. १५० कोटी झालेला असून, गतवर्षीच्या तुलनेत ढोबळ करपूर्व नफा रु. १६ कोटी ५५ लाखांनी वाढलेला आहे. बँकेने सलग १४ व्या वर्षी बँकेच्या नक्त अनुत्पादक कर्जाचे प्रमाण ‘शून्य टक्के’ राखण्यात यश प्राप्त केलेले आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था, बँकिंग, उद्योग व व्यवसाय या सर्व क्षेत्रांना कोरोनाच्या संकटामुळे अडचणी निर्माण झाल्या. या अडचणींवर मात करीत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत बँकेच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवून बँकेची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे.
दिनांक ३१ मार्च २०२१ अखेर बँकेचा संमिश्र व्यवसाय रु. १३,८४५ कोटींचा झालेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत संमिश्र व्यवसायात रु. ९७८ कोटींची वाढ झालेली आहे. दि. ३१ मार्च २०२१ अखेर बँकेच्या ठेवी रु. ८४३० कोटी ५ लाख झालेल्या असून, गतवर्षीच्या तुलनेत ठेवींमध्ये रु. ८०७ कोटी ७७ लाखाची वाढ झालेली आहे. बँकेची वर्षाखेर एकूण कर्जे रु. ५४१५ कोटी २५ लाख असून, गतवर्षीच्या तुलनेत एकूण कर्जात रु. १७० कोटींने वाढ झालेली आहे. बँकेची गुंतवणूक रु. ३९७५ कोटी ७० लाख असून, गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये रु. ८०४ कोटीने वाढ झालेली आहे. बँकेचे स्वनिधी रु. ६५८ कोटी २० लाख असून, गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये रु.५३ कोटी ८४ लाखांनी वाढ झालेली आहे.
उत्कृष्ट कामकाज नियोजन, कर्ज वाटप व वसुली याची प्रभावी अंमलबजावणी आदी बाबींमुळे बँकेस विक्रमी करपूर्व ढोबळ नफा झालेबद्दल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांचे बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, बँकेचे ज्येष्ठ संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, संचालक व सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, आणि सर्व संचालक मंडळाने कौतुक केले.