वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील एका गावात पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. याप्रकरणी संतोष आबासाहेब भोईटे (वय ४६) याला वाठार स्टेशन पोलिसांनी तत्काळ अटक केली. मात्र, यावेळी पोलिस ठाण्यासमोर संतप्त जमावातील एकाने आरोपीच्या अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच अटकाव केल्याने अनर्थ टळला. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संबंधित बालिकेचे आई-वडील, आजी पंचक्रोशीत मोलमजुरी करतात. मुलीचे आई-वडील गुरुवारी पहाटे वाई तालुक्यातील एका गावात मजुरीसाठी गेले होते. आजी गावातीलच शेतात भांगलणीसाठी गेली होती. संबंधित बालक बालवाडीत जाते. मात्र, ती गुरुवारी आजीबरोबर शेतात गेली होती. सायंकाळी काम संपल्यानंतर सायंकाळी पाच वाजता शेतमालकाने स्वत:ची मुलगी अन् पीडित मुलीला मोटारसायकलवरून गावात आणले. तिला घरी सोडून ते निघून गेले. दरम्यान, संतोष भोईटे त्याच्या शेताकडे चालत निघाला होता. त्याने आजीची वाट पाहत असलेल्या मुलीला बोलावून हातात दहा रुपये देत ‘चल, तुला चॉकलेट देतो,’ असे सांगितले. तिला घराच्या पाठीमागे असलेल्या छपरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो निघून गेला. वेदना असह्य झाल्याने संबंधित मुलगी रडत रस्त्याकडे धावली आणि आजीची वाट पाहात रडू लागली. आई आणि आजी घरात आल्यानंतर त्याना तिने झालेला प्रकार सांगितला. आई-आजींनी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता वैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थांनी सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी तातडीने दवाखान्यात धाव घेतली. प्राथमिक उपचार करून तिला जिल्हा रुग्णालयात हलविले. संबंधित बालिकेने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी संतोष भोईटे याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. रात्री त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याबाबत बालिकेच्या आईने फिर्याद दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच शुक्रवारी सकाळपासून विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, ग्रामस्थांनी पोलिस ठाण्याजवळ गर्दी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. तत्पूर्वी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, दहिवडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत काळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाबाबत सूचना केल्या.अत्याचारानंतर आरोपी आरतीमध्ये दंग !भयानक कृत्य करूनही संतोष भोईटे याच्यावर कसलाही परिणाम झालेला नव्हता. अत्याचार केल्यानंतर गावातील एका मंदिरात आरतीला तो उपस्थित होता. त्यानंतर गावातही फिरला. रात्री आठ वाजता घरी जाऊन काही न घडल्याच्या अविर्भावात तो जेवत होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.जमाव पोलिस ठाण्यावरचिमुकलीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळताच शुक्रवारी सकाळपासून विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, ग्रामस्थांनी वाठार पोलिस ठाण्यावर चाल केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दंगा नियंत्रण पथकाला पोलिसांनी पाचारण केले होते. मात्र, आरोपीला न्यायालयात नेताना त्याच्यावर जमावाने पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच अटकाव करून जमावाला पांगविले. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
बालिकेवरील अत्याचाराने सातारा जिल्हा संतप्त!
By admin | Updated: July 29, 2016 23:18 IST