सातारा : एप्रिल महिना आत्ताशी सुरू झाला नाही तोच, सूर्यनारायण आग ओकायला लागले आहेत. शुक्रवारी सातारा शहरातील तापमान ४० अंश सेल्सीअसच्या घरात पोहोचला आहे. उन्हाच्या चटक्यापासून बचाव करण्यासाठी मिळेल त्या वस्तूंचा आधार घ्यावा लागत आहे.जिल्ह्यातील सर्वच ॠतू तीव्र स्वरूपाचे असतात. सर्वसाधारणपणे मे महिन्यातील उन्हाळा असह्य असतो. मात्र, परिसरातील डोंगरी प्रदेश, विमुल वनसंपदा असल्याने गार झुळूक येत असते. त्यामुळे कडक उन्हातही फारसा फरक पडत नाही. यंदा मात्र, एप्रिलमध्येच उन्हाचा पारा उसळी मारत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून ३५ ते ३८ अंश सेल्सीअसच्या घरात असायचा. शुक्रवारी मात्र कहरच झाला. ३९.५ अंश सेल्सीअसची पातळी ओलांडली आहे.कडक उन्हामुळे सावलीत बसले तरी उन्हाच्या झळा बसत आहेत. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे उष्माघातासारख्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या रुग्णालयांमध्ये वाढत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे त्रासलेल्या जीवाला शांत करण्यासाठी शहरातील रसवंतीगृह, आयस्क्रिम पार्लरमध्ये गर्दी होऊ लागली आहे. तसेच माठातील पाणी, फ्रीजमधील पाण्याचा वापर केला जात आहे. दरम्यान, उन्हातून आल्यानंतर लगेच अति थंड पाणी पिण्याचे शक्यतो टाळावे, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत. (प्रतिनिधी)अंघोळीचा टपउन्हाच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी शहरात आलेले लोक मिळेल त्या साधनांचा वापर करत आहेत. दुकानातून आंघोळीसाठी बांथरूममध्ये बसायला वापरला जाणारा टप चक्क डोक्यावर ठेवून एक काका निघाले होते. तर टीव्हीचा रिकामा पुट्टा डोक्याला अडवा लावून एक काका निघाले होते. महिला तसेच तरुणी घरातून बाहेर पडतानाच छत्र्या घेऊन जातात. तसेच चेहऱ्याला रुमाल, स्टोल, ओढणींच्या साह्याने झाकून घेत असतात. कापडी टोप्या बाजारात आलेल्या असल्या तरी वाल्यापासून बनविलेल्या टोप्या वापरण्यावर भर दिला जात आहे. त्या नैसर्गिकपणे गारवा देत आहेत.
सातारा @ 4० अंश सेल्सिअस...
By admin | Updated: April 2, 2016 00:03 IST