सचिन काकडे सातारा : वेळ सकाळी नऊची.. एक चार वर्षांची चिमुकली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडणार होती.. इतक्यात कानावर शब्द आदळले ‘बच्ची गीर रही हैं’ .. क्षणाचाही विचार न करता एका सातारकराने घटनास्थळी धाव घेतली अन् त्या मुलीचे प्राण वाचविले. ही कुठल्या चित्रपटातील घटना नसून पुणे येथे घडलेली खरीखुरी घटना आहे.वाई तालुक्यातील देगाव येथील रहिवासी योगेश अर्जुन चव्हाण हे गेल्या पंधरा वर्षांपासून पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवा करत आहे. सध्या ते प्रमुख अग्निशमन विमोचक (तांडेल) म्हणून कार्यरत आहे. या घटनेची माहिती देताना त्यांनी सांगितले की, ‘पुण्यातील कात्रज गुजरवाडी येथे सोनवणे नामक इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणारी एक महिला आपल्या चार वर्षांच्या मुलीला घरात झोपवून दुसऱ्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेली होती. ती बाहेर पडल्यानंतर बेडरूममध्ये झोपी गेलेली ती चिमुकली खिडकीतून बाहेर आली. तिचे संपूर्ण शरीर बाहेर व डोके आत रेलिंगमध्ये फसले होते.सकाळी ९ वाजून १० मिनिटांची ही वेळ होती. ही घटना एका गृहस्थांच्या निदर्शनास आली, तेव्हा त्यांनी ‘बच्ची गीर रही हैं.. बच्ची गीर रही हैं’, अशी आरोळी दिली. मी शेजारच्या इमारतीत राहत असल्याने माझ्या कानावर हे शब्द पडले. मी बाहेर आलो अन् पाहतो तर ती मुलगी खिडकीतून खाली लटकत होती. क्षणाचाही विचार न करता मी त्या इमारतीत धाव घेतली. घरात बाहेरून कुलूप होते. कुलूप तोडण्यासाठी म्हणून मी काहीतरी शोधाशोध करत होतो.इतक्यात दुसऱ्या मजल्यावर एक महिला दिसल्या. त्यांना या घराबाबत विचारणा केल्यास सुदैवाने ते घर त्या महिलेचेच निघाले. त्यांच्याकडून चावी घेऊन तातडीने घराचे कुलूप काढले. बेडरूमला बाहेरून कडी लावली होती. ती काढली अन् त्या मुलीला सुरक्षित बाहेर काढले. मुलीला कुठे काही इजा झाली नाही ना याची खातरजमा करून मुलीला तिच्या आईच्या स्वाधीन केले. तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला.जवान योगेश चव्हाण यांच्या या धाडसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्यांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळल्याने त्यांचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे.
‘त्या’ घटनेलाही उजाळा!२ ऑक्टोबर २०१८ साली खंडाळा डेपोच्या पुणे-महाबळेश्वर एस.टी. बसला कात्रज बोगद्याजवळ आग लागली होती. त्याच एस.टी.च्या पाठीमागून येणारे जवान योगेश चव्हाण यांना ही घटना निदर्शनास आली. त्यांनी प्रसंगावधान दाखविल्याने एस.टी.तील १९ प्रवासी सुखरुप बचावले होते.