याबाबतचे निवेदन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कऱ्हाड प्राचीन काळापासून व्यापारी केंद्र आहे. कोकण व पूर्वेकडील दुष्काळी भागासाठी कऱ्हाडची बाजारपेठ हीच खरी दुवा आहे. दहा वर्षे अतिवृष्टी व कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पावसाळ्यात व्यापारीपेठेत पुराचे पाणी घुसते. परिणामी व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होते. यंदाही तोच अनुभव आला. जुलै महिन्यात आलेल्या पुरामुळे मुख्य बाजारपेठेतील वीस ते पंचवीस व्यापाऱ्यांच्या गोदामात पाणी शिरले. त्यांच्या मालाचे अतोनात नुकसान झाले. प्रतिवर्षी येणाऱ्या पुरामुळे आणि दोन वर्षांपासून कोरोनामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. व्यापारी आर्थिकदृष्ट्या खचले आहेत. शासनाने पूरग्रस्त रहिवाशांसह व्यापाऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. त्याचा कऱ्हाड शहरासह तालुक्यातील व्यापाऱ्यांना फायदा होणे अपेक्षित आहे. त्यासाठी ज्यांचे पुरामुळे नुकसान झाले आहे, त्यांना लाभ मिळावा, या दृष्टीने आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पाठपुरावा करावा.
याबाबत पालिकेनेही पाहणी अहवालाची मागणी करावी. त्यानंतर शासनाकडून व्यापाऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.