नितीन काशीद यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शेंद्रे ते कागल महामार्ग चौपदरीकरण २००३ मधील योजनेत अनेक त्रुटी आहेत. प्रामुख्याने कऱ्हाड शहरातील कोल्हापूर नाका येथील एकेरी उड्डाण पुलाजवळ प्रचंड अपघाताचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच विविध ठिकाणी अपघात प्रवण क्षेत्र निर्माण झालेली आहेत. यात प्रामुख्याने स्थानिक नागरिकांचा बळी जात असून जीवित हानी होत आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामार्गाच्या सहापदरीकरणाची योजना मार्गी लागणे गरजेचे आहे. सन २०१६-१७ पासून शेंद्रे ते कागल सहापदरीकरण योजनेचे काम हाती घेतले आहे. याबाबत वारंवार निविदा प्रसिद्ध झाल्या. मात्र, आजअखेर या प्रकल्पाचे काम मार्गी लागले नाही. एनएचएआयच्या नवी दिल्ली कार्यालयाकडून या योजनेच्या निविदा वारंवार पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. यामुळेच हा प्रकल्प प्रलंबित आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून जनहितार्थ शेंद्रे ते कागल महामार्गाच्या सहापदरीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यास सहकार्य करावे, असे साकडे शिवसेनेचे कऱ्हाड तालुकाप्रमुख नितीन काशीद- पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रकाद्वारे घातले आहे. थेट मुख्यमंत्र्याकडे पत्रव्यवहार केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.
- कोट
कोल्हापूर नाका येथील एकेरी उड्डाणपुलाजवळ अपघाती क्षेत्र निर्माण झाले आहे. ही बाब विचारात घेऊन मी स्वत: चार वेळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे सार्वजनिक बांधकाम उपक्रममंत्री एकनाथ शिंदे व एनएचएआयच्या नवी दिल्ली कार्यालयाकडे पत्रकाद्वारे काम करण्याची मागणी केली आहे. प्रत्येक वेळी आराखडा तयार केल्याचे प्रत्युत्तरही आले आहे. मात्र, गेली अनेक वर्षे काम झालेले नाही.
- नितीन काशीद-पाटील
शिवसेना, कऱ्हाड तालुकाप्रमुख
फोटो : ०९केआरडी०१
कॅप्शन : शेंद्रे ते कागल रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम रखडल्यामुळे कऱ्हाड येथील कोल्हापूर- सातारा लेनवरील नियोजित उड्डाणपुलाचा प्रश्न रेंगाळला आहे.