सातारा : प्रतापगडावर घडलेल्या देदीप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या वाघनखांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले. या शाही सोहळ्यापूर्वी साताऱ्यातील पोवई नाका येथे असलेल्या शिवमूर्तीला अभिवादन करून काढण्यात आलेली भव्य-दिव्य रॅली, शिवपराक्रमाच्या गगनभेदी गर्जना, पारंपरिक वाद्यांचा गजर अन् मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी शाहूनगरीत शिवकाल अवतरल्याची प्रचिती आली.साताऱ्यातील संग्रहालयात शुक्रवारी दुपारी पार पडलेल्या या ऐतिहासिक सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक सुजितकुमार उगले, सहायक अभिरक्षक प्रवीण शिंदे आदी उपस्थित होते.लंडन येथील व्हिक्टोरिया ॲन्ड अल्बर्ट म्युझियमध्ये असलेली ही वाघनखे बुधवारी स्वराज्याची चौथी राजधानी असलेल्या साताऱ्यात दाखल झाली. येथील वस्तुसंग्रहालयात तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र दालनात ही वाघनखे ठेवण्यात आली आहेत. या ऐतिहासिक वाघनखांसह ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन करण्यात आले.उद्घाटन सोहळ्यापूर्वी पोवई नाक्यावर असलेल्या शिवमूर्तीला मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन करण्यात आले. यानंतर पोवई नाका ते संग्रहालय अशी रॅली काढण्यात आली. या रॅलीत सातारकर मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅली संग्रहालयात आल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले.मर्दानी खेळांनी जागवला शिवकालसंग्रहालयाच्या दर्शनी भागात कोल्हापूर येथील शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या मावळ्यांकडून ऐतिहासिक खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. वीटा, बाण, पट्टा लढत, काठी, कुऱ्हाड व तलवारीच्या लढतींनी डोळ्यांचे पारणे फेडले. फेटेधारी मावळे, घोडे, तुतारीचा निनाद अन् शिवपराक्रमाच्या गर्जनांनी वातावरण शिवमय झाले.संग्रहालयाच्या नूतन वास्तूचे लोकार्पणछत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयातील शस्त्र, वस्त्र, नाणी या दालनांचे काम पूर्णत्वास आले आहे. मात्र, या संग्रहालयाच्या नूतन वास्तूचे अद्याप लोकार्पण करण्यात आले नव्हते. वाघनखांच्या अनावरण सोहळ्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संग्रहालयाचे लोकार्पण करून हे संग्रहालयात शिवप्रेमींसाठी खुले करण्यात आले.संग्रहालयाच्या संपूर्ण इमारतीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. इमारतीवर भगवे ध्वज लावण्यात आले होते. दर्शनी भागातही ऐतिहासिक बाज असलेला मनोरा उभारण्यात आला होता. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संग्रहालय व परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात होता.
साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात शाही सोहळा, ऐतिहासिक वाघनखे शिवप्रेमींसाठी खुली
By सचिन काकडे | Updated: July 19, 2024 17:39 IST