सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू करतानाच गोरगरिबांच्या उदरनिवार्हाचा प्रश्नही मार्गी लावला आहे. शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला असून, जिल्ह्यातील तब्बल अडीच हजार गोरगरीब या भोजनाचा लाभ घेत आहेत.
हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना पोटभर अन्न मिळावे यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी प्रत्येक जिल्ह्यात सुरू केली आहे. सातारा जिल्ह्यात शिवभोजन थाळी देणारी १० केंद्रे असून, पूर्वी दररोज साडेतीन हजार नागरिक या थाळीचा लाभ घेत होते. यासाठी दहा रुपये शुल्क आकारले जात होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या कालावधीत अनेकांची ‘रोजी’ बंद झाली आहे. अशा लोकांना शिवभोजन थाळीच्या माध्यमातून ‘रोटी’ देण्याचे काम राज्य शासनाने केले आहे.
शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय घेतला असून, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही थाळी मोफत दिली जात आहे. सद्य:स्थितीला जिल्ह्यातील अडीच हजार गरीब शिवभोजन थाळीतून आपले पोट भरत आहेत. शिवभोजन थाळी सुरू झाल्यापासून जिल्ह्यातील तब्बल ८ लाख २० हजार गोरगरिबांनी याचा लाभ घेतला आहे.
(कोट)
आमचं हातावर पोट आहे. काम मिळालं तरच घर चालतं. संचारबंदीमुळे आता रोजी पूर्णत: बंद आहे. मात्र, शासनाच्या शिवभोजन थाळीने रोटी देऊन आम्हाला मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयाचे कौतुक करावे लागेल.
- विशाल साखरे, सातारा
(कोट)
मी मोलमजुरी करतो. मिळेल ते काम करतो. मला शिवभोजन थाळीचा मोठा आधार मिळत आहे. संचारबंदीमुळे सर्वच कामे थांबल्याने पोटापाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र, शासनाने शिवभोजन थाळी मोफत देऊन हा प्रश्न मार्गी लावला.
- ज्ञानेश्वर पवार, सातारा
(कोट)
शिवभोजन थाळी गोरगरिबांचे पोट भरण्याचं काम करीत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मी शिवभोजन थाळीचा लाभ घेत आहे. शासनाने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न मार्गी लावून संचारबंदीच्या काळात आम्हाला मोठा दिलासा दिला आहे.
- विठ्ठल कदम, सातारा
(पॉइंटर)
जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्रे - १०
लाभ घेणारे नागरिक - २५००
(डमी न्यूज)