सातारा : येथील खेड परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या हॉटेल महेंद्रसमोरील कालव्यानजीक सर्व्हिस रस्त्याने चालत जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी एका परप्रांतीय कामगार तरुणाला अडवून मारहाण करत त्याच्या खिशातील १० हजार रुपये व ड्रील मशीनसह साहित्य जबरदस्तीने चोरुन नेले. ही घटना दि. १५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार तरुण आशपाक तफेल अहमद खान (वय २१, रा. वसंतनगर कॉलनी, खेड, मूळ रा. उत्तरप्रदेश) हा दि. १५ रोजी सांयकाळी हॉटेल महेंद्रसमोरील कालव्यानजीक सर्व्हिस रोडने चालत निघाला होता. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी त्याला थांबवले.
यावेळी दोघांनी आशपाक याला शिवीगाळ, दमदाटी करत मारण्यास सुरुवात केली तसेच त्याच्या खिशातील दहा हजार रुपये काढून घेतले आणि हातातील पिशवीत असलेली ड्रील मशीन काढून त्याच्या डोक्यात मारुन त्याला जखमी केले. त्यानंतर या चोरट्यांनी रोख रक्कम, ड्रील मशीन व कामाचे इतर साहित्य घेऊन तेथून पलायन केले.
या घटनेमुळे घाबरलेल्या आशपाक याने सातारा शहर पोलीस ठाण्यात येत रितसर तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर दोन अनोळखी व्यक्तींवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम करत आहेत.