सातारा : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका फर्निचर व्यावसायिकाला मारहाण करून त्याची दुचाकी व त्याचा मोबाइल चोरून नेल्याची घटना खराडेवाडी, ता. फलटण गावच्या हद्दीत दि. ३ रोजी रात्री आठ वाजता घडली.
अनोप मुलाराम (वय २३, रा. कोळकी, ता. फलटण, मूळ रा. राजस्थान) हा फर्निचर व्यावसायिक आहे. बडेखान ते साखरवाडी रस्त्याने तो जात असताना दुचाकीवरून तिघेजण तेथे आले. साखरवाडी रोड कुठे जातो, असे विचारत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संबंधितांनी त्याची दुचाकी आणि मोबाइल घेऊन तेथून पलायन केले. या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी त्याने लोणंद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितलेल्या वर्णनावरून शोधमोहीम सुरू केली आहे. संबंधित चोरटे हे माहीतगार असावेत, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.