लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : कऱ्हाड शहरातील अंतर्गत रस्त्यांसह मुख्य रस्त्यांच्या रूंदीकरणाचे काम सध्या पालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याच्या उद्देशाने ठेकेदारांकडून प्रयत्न केले जात असताना रस्ता कामामध्ये अडथळे ठरणाऱ्या वृक्षांना मात्र, जीवदान दिले मिळत आहे. मध्यंतरी रस्ता रूंदीकरण व गटार बांधकाम करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात सर्रासपणे वृक्षतोड केली जात असल्याने याबाबत पालिका प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारास नोटीसा दिल्याने वृक्षतोड न करताच कामे पूर्ण करण्याचे काम सध्या केले जात आहे. कऱ्हाड शहरातील कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका या मुख्य मार्गावर रस्ता रूंदीकरणाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यासाठी प्रथम रस्त्याकडेला नाले बांधकाम केले जात आहे. यातील कोल्हापूर नाका ते विजय दिवस चौकापर्यंत नाले बांधकाम व पादचारी मार्ग उभारणीचे कामे पूर्ण करण्यात आली आहेत. दरम्यान, या कामामध्ये पंधरा मीटर रस्त्याची रूंदी करताना रस्त्याच्या मध्यभागी एक मीटर रूंदीच्या दुभाजकाचे बांधकाम केले जात आहे. कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका या दरम्यानच्या रस्ता रूंदीकरणाच्या कामात अडीचशे वृक्षांचा अडथळा येत असल्याने त्यांच्यावर ठेकेदाराकडून कुऱ्हाड पडणार असल्याची चर्चा केली जात होती. मात्र, यास सुरूवातीस वृक्षप्राधिकरण समितीच्या वतीने विरोध करण्यात आला. ठेकेदाराने वृक्षतोड न करता पदपथ व रस्ता रूंदीकरणाचे कामे करावे, अशी मागणीही करण्यात आली. त्यानुसार ठेकेदाराने सुरूवातीस पादचारी मार्गाची कामे सुरू केली. ती जवळपास पूर्णत्वास आली आहे. सध्या दत्त चौक ते विजय दिवस चौक मार्गापर्यंत दुभाजक व रस्ता डांबरीकरणाचे काम केले जात आहे. यातील दत्त चौक ते बसस्थानक या मार्गावर हे काम होत आले असून या ठिकाणी जवळपास पाच ते सहा वृक्ष असल्याने ते रस्त्याच्या मध्ये येत आहेत. त्यामुळे या वृक्षांवर ठेकेदार कुऱ्हाड मारणार की काय असे सुरूवातीस वाटले होते. मात्र, ठेकेदाराने तसे न करता वृक्ष तसेच ठेवून सभोवतालच्या परिसरात खुदाई करण्यास सुरूवात केल्याने या वृक्षांना जीवनदान दिल्याचे दिसून आले. ऐरवी रस्त्यांची कामे म्हटले की, बेसुमारपणे वृक्षतोड करणे व्यापारी, विक्रेत्यांना नाहक त्रास देत कामे करणे असे प्रकार संबंधित बांधकाम ठेकेदाराकडून केली जातात. त्याचे परिणाम भविष्यकाळात पहावे लागतात. सध्या शहरातील कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका या मुख्य मार्गावरील रस्त्याच्या रूंदीकरणाची कामे ठेकेदाराकडून केली जात असल्याने या कामांमध्ये अडथळे ठरणारे विजेचे खांब, उंच वृक्ष यांना तसेच ठेऊन कामे पूर्ण केली जात आहेत. रस्ता रूंदीकरणाच्या कामात वृक्षाप्रमाणे वीज वितरण कंपनीच्या लोखंडी पोलचा अडथळा येत आहे.रस्ता रूंदीकरण व नाला बांधकाम करण्यापूर्वी विद्युत पोल हटविणे गरजेचे आहे. मात्र, वीज वितरण कंपनीकडूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परंतु पोल न हटविता ठेकेदाराकडून काम केले जात आहे. याप्रकाराबाबत नागरिकांच्यातूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कऱ्हाड शहरतील दत्त चौक ते बसस्थानक मार्गावरील रस्त्याचे मध्यंतरी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, आता डांबरीकरणाची पुन्हा खुदाई केली जात असल्याने या प्रकाराबाबत नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रस्ता रुंदीकरणाच्या कामात वृक्षांना जीवदान !
By admin | Updated: May 9, 2017 23:34 IST