म्हसवड : माण व खटाव तालुक्याला जोडणारा नंदीनगर घाटातील रस्ता जीवघेणा बनला आहे. अनेक वर्षे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तातडीने या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास कुकुडवाड ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मायणी - म्हसवड रस्त्यावरील कुकुडवाडनजीक माण व खटाव तालुक्यांच्या सरहद्दीवर हा नंदीनगर घाटरस्ता आहे. हा रस्ता म्हसवडपासून कर्नाटक राज्यात जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूक आहे. दरम्यान, पिंगळी ते कातरखटाव हा रस्ता खूपच खराब असल्याने या रस्त्यावरून सांगली, कोल्हापूरला जाणारी संपूर्ण वाहतूक सध्या याच रस्त्यावरून सुरू आहे. मात्र, ऊस वाहतूक व चोरटी वाळू वाहतूक व त्यातच लांबपल्ल्याची, अवजड वाहने यांची मोठी वर्दळ या रस्त्यावर आहे. मात्र, कुकुडवाड येथील नंदीनगर घाटात रस्त्याला मोठे खड्डे पडले असून, मोठ्या वाहनांसह छोट्या गाड्याही यात आपटत आहेत.
घाटात मोठे खड्डे असल्याने दुचाकी चालवताना मोठी कसरत सुरू आहे. चारचाकी व अवजड वाहने मध्येच अडकून पडत आहेत. अनेकवेळा रस्ता बंद होत आहे. दरम्यान, म्हसवड व मायणी याठिकाणी मोठी कोरोना सेंटर सुरू असून, रुग्णांची वाहतूक या रस्त्यावरुन करताना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेकवेळा घाटात मोठे वाहन अडकलेल्या अवस्थेत असल्याने रुग्णवाहिका अडकून पडत आहेत. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
गेल्या काही दिवसात पावसाने व अवजड वाहतुकीमुळे रस्ता अतिशय खराब झाला आहे. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या महिलेला जीव गमवावा लागला आहे. म्हसवड ते मायणी हा अतिशय महत्त्वाचा रस्ता असूनही बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा कुकुडवाड ग्रामस्थ रस्ता रोखून आंदोलन करतील, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य मनोजकुमार काटकर यांनी दिला आहे.
===Photopath===
200621\1533-img-20210620-wa0037.jpg
===Caption===
नंदिनगर घाटात रस्ता झालाय जीवघेणा!