कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यात सुर्ली, शामगाव या दोन घाटांव्यतिरिक्त इतर घाटमार्ग नाहीत. मात्र, पाटण तालुक्यात घाटमार्गांचे जाळे विणले गेले आहे. त्यापैकी काही घाटांत दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे स्थानिकांसह प्रवाशांनाही जीव मुठीत घेऊनच या मार्गांवरून प्रवास करावा लागतो.
घाटातील वाहतूक निर्धाेक व्हावी, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र, बांधकामसह इतर विभागांकडून त्याकडे म्हणावे तेवढ्या गांभीर्याने पाहिले जात नाही. कऱ्हाड तालुक्यात शामगाव आणि सुर्ली हे दोनच घाट आहेत. त्यापैकी शामगाव घाटात काहीवेळा अतिवृष्टीमध्ये मोठमोठे दगड कोसळण्याच्या घटना घडतात. यापूर्वी अशा काही घटना घडल्या आहेत. मात्र, सुदैवाने त्यामध्ये जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. या घाटातील तुटलेले संरक्षक कठडेही अपघाताला निमंत्रण देणारे ठरतात. सुर्ली घाटात दरडीचा धोका तुलनेने कमी आहे. मात्र, वळणांच्या जाळ्यामुळे प्रवासाच्यादृष्टीने हा घाट अवघड आहे.
पाटण तालुक्यातील दिवशीचा घाट हा जिल्ह्यातील सर्वात मोठा घाटरस्ता मानला जातो. ढेबेवाडी खोऱ्यातील मालदन गावापासून मरळी खोऱ्यापर्यंत असलेल्या या विस्तृत घाटमार्गावर ठिकठिकाणी दरडी कोसळण्याची भीती आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी मोठमोठे दगड आणि डोंगराचा काही भाग सुटलेला दिसून येतो. यापूर्वी दरडी कोसळून अनेकवेळा या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. बांधकाम विभागाने दरडीचा धोका कमी करण्याच्या उद्देशाने डोंगर पोखरला आहे. मात्र, अद्यापही हा धोका पूर्णपणे टळलेला नाही. विहे आणि उरूल हे घाट लहान असून, या मार्गावर कधीही दरडीचा प्रश्न निर्माण झालेला नाही. चाफळ आणि तारळे विभागातील घाटमार्गही लहान आहेत. त्यामुळे तेथेही दरडीचा धोका नाही. मात्र, तुटलेले संरक्षक कठडे, खराब रस्ते आणि तीव्र चढण यामुळे या घाटांतील प्रवासही सुरक्षित नाही.
- चौकट
कऱ्हाड, पाटणचे घाट
१) शामगाव घाट
मार्ग : कऱ्हाड - पुसेसावळी
अंतर : ३ किलोमीटर
२) सुर्ली घाट
मार्ग : कऱ्हाड - विटा
अंतर : ४ किलोमीटर
३) दिवशी घाट
मार्ग : ढेबेवाडी - नवारस्ता
अंतर : १० किलोमीटर
४) विहे घाट
मार्ग : कऱ्हाड - पाटण
अंतर : किलोमीटर
५) उरूल घाट
मार्ग : नवारस्ता - उंब्रज
अंतर : १.५ किलोमीटर
६) काठी अवसरी घाट
मार्ग : पाटण - काठी
अंतर : २.५ किलोमीटर
- चौकट (फोटो : २१ केआरडी ०५)
डेळेवाडी खिंडही धोकादायक
कोळेवाडीतून तांबवेकडे जाणाऱ्या मार्गावर डेळेवाडी येथे खिंड असून, ही खिंड धोकादायक ठरत आहे. खिंडीत वारंवार दरड कोसळण्याची घटना घडते. दरवर्षीच्या पावसाळ्यात मोठमोठ्या दगडांसह डोंगराचा काही भाग खिंडीत कोसळतो. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होते.
फोटो : २१ केआरडी ०६
कॅप्शन : पाटण तालुक्यातील दिवशी घाट हा सर्वाधिक लांबीचा घाट असून, या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका आहे.