कोरोनामुळे गतवर्षी ऋषिपंचमी व्रत मोजक्या महिलांना करता आले. अपवाद वगळता उर्वरित महिलांना व्रत करता आले नाही. यावर्षी मात्र निर्बंध काहीसे कमी झाल्याने महिलांना पंचमी साजरी करता आली. कृष्णा-कोयना नदीच्या पात्रात स्नान करून महिलांनी वाळवंटात ऋषी पूजा केली. कऱ्हाड शहरासह नजीकच्या ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. ऋषिपंचमीचे व्रत भाद्रपदातील शुक्ल पंचमीला केले जाते. सामान्यत: हे व्रत गणेश चतुर्थीच्या नंतरच्यादिवशी आणि हरितालिका व्रताच्या दोन दिवसांनंतर केले जाते. हे व्रत स्त्रियांना अखंड सौभाग्य देणारे असल्याचे मानले जाते. यादिवशी देवदेवतांचे पूजन केले जात नाही. पंचमीच्यादिवशी सप्तऋषींची पूजा केली जाते. महिला या दिवशी सप्तऋषींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि सुख, शांती व समृद्धीसाठी हे व्रत करतात. यात पूजा केल्यानंतर ऋषिपंचमीच्या व्रताची कथा ऐकवली जाते. शेकडो महिलांनी कृष्णा-कोयना नदीच्या संगमावर स्नान करून ऋषी पूजन केले.
फोटो : १३केआरडी०१
कॅप्शन : कऱ्हाडातील प्रीतिसंगमावर महिलांनी ऋषी पूजन केले.