पुसेगाव : नुकतीच केंद्र शासनाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली आहे. बैलगाडी शर्यतीमध्ये क्रूरपणा होऊ नये, यासारख्या अटींचे पालन करून शर्यतींना परवानगी देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे. या नियमांच्या अधिन राहून श्री सेवागिरी महाराजांच्या ६७ व्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षीप्रमाणे गुरुवार, दि. १८ डिसेंबर रोजी बैलगाड्यांच्या जंगी शर्यती होणार असल्याची माहिती श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव व विश्वस्त विजय द. जाधव यांनी दिली.ग्रामीण भागातील यात्रांचा अविभाज्य अंग असलेल्या या शर्यती ग्रामीण जीवनातील शेतकरी व बैलगाडी शर्यत शौकिनांचा पारंपरिक वारसा असल्यामुळे या शर्यतीवरील बंदी उठविण्यात येत असल्याचे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केले. केंद्र शासन व प्रकाश जावडेकर यांच्या या निर्णयामुळे श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेत बैलगाडी शर्यती आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे.श्री सेवागिरी यात्रा नियोजनासाठी नुकत्याच आयोजित केलेल्या ग्रामसभेत श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांनी यात्रेदरम्यान बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठली तर शर्यती निश्चितपणे घेण्यात येतील, असे जाहीर केले होते. पुसेगाव यात्रेनिमित्त होणाऱ्या बैलगाडी शर्यतींचे शौकिन व यात्रेकरूंना खास आकर्षण असते. नि:पक्ष व भव्य स्वरूपात होणाऱ्या बैलगाडी शर्यतीतील अंतिम फेरीच्या प्रथम ते सहा बैलगाड्या विजेत्यांना अनुक्रमे ५१,०००, ४१,०००, ३१,०००, २१,०००, ११,०००, ७००० बक्षीस रोख रुपये, श्री सेवागिरी चषक व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. शर्यतीचे उद्घाटन मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव-पाटील, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव-पाटील, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय द. जाधव, अॅड. विजयराव जाधव व मान्यवरांच्या हस्ते होईल. तद्नंतर शर्यतीस सुरुवात होईल. दरवर्षी शर्यती पाहण्यासाठी सुमारे ५० े ६० हजार शौकिन उपस्थित असतात. केंद्र शासनाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर सर्वप्रथम पुसेगावच्या प्रख्यात असलेल्या बैलगाडी शर्यती होणार आहेत. यामुळे बैलगाडी शौकिनांची गर्दी वाढणार निश्चित. यात ५५० गाड्या सहभागी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)गावच्या गाडीला मात्र फाटा...प्रत्येक फेऱ्यात प्रथम ते तृतीय येणाऱ्या बैलगाड्या विजेत्यांना अनुक्रमे ३००, २००, १०० रुपये रोख बक्षीस व सेमी फायनल प्रथम ते तृतीय येणाऱ्या बैलगाड्या विजेत्यांना अनुक्रमे ५००, ३००, २०० रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. या शर्यतीसाठी प्रवेश फी ५०० रुपये असणार आहे. सकाळी ८ ते १२ या वेळेत बैलगाड्यांची नोंद केली जाणार असून सोबत दोन्ही बैलांवर नंबरही टाकले जाणार आहेत. दुपारी १२ नंतर येणाऱ्या बैलगाड्यांचा विचार केला जाणार नाही. पुसेगावची अथवा पुसेगावच्या नावावर कोणतीही गाडी पळवली जाणार नाही. फेरा, समी फायनल व फायनल चिठ्ठीद्वारे होणार आहेत.
बैलगाडी शर्यतीची परंपरा अबाधित
By admin | Updated: December 9, 2014 00:32 IST